‘ताराराणी’-राष्ट्रवादीत राडा,,मुश्रीफ-नाना कदम यांच्यात खडाजंगी

By admin | Published: October 27, 2015 01:03 AM2015-10-27T01:03:34+5:302015-10-27T01:06:35+5:30

सत्यजित कदम यांचे कार्यालय, गाडीवर दगडफेक, लाटकर यांचेही कार्यालय, बंगला, गाडीची तोडफोड

'Tararani' -Radha in the NCP, Khadajangi between Mushrif-Nana Kadam | ‘ताराराणी’-राष्ट्रवादीत राडा,,मुश्रीफ-नाना कदम यांच्यात खडाजंगी

‘ताराराणी’-राष्ट्रवादीत राडा,,मुश्रीफ-नाना कदम यांच्यात खडाजंगी

Next

विचारेमाळ-कदमवाडी परिसरात तणाव; राजू लाटकर यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न

सत्यजित कदम यांचे कार्यालय, गाडीवर दगडफेक, लाटकर यांचेही कार्यालय, बंगला, गाडीची तोडफोड

सुहास लटोरे, सुनील कदम, आशिष ढवळे यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा

कोल्हापूर : महापालिका निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी व भाजप-ताराराणी आघाडीच्या प्रमुख नेत्यांत व कार्यकर्त्यांत सोमवारी दुपारी राडा झाला. शिवाजी पार्क येथे फोनवर बोलत थांबलेले राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजू लाटकर यांच्या अंगावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न भाजप-ताराराणी आघाडीचे प्रमुख नेते सुहास लटोरे, सुनील कदम व आशिष ढवळे यांनी केला. दरम्यान, लाटकर यांना मारहाण झाल्याची माहिती समजताच विचारेमाळ येथील लाटकर समर्थकांनी भाजप-ताराराणी आघाडीचे सत्यजित ऊर्फ नाना कदम यांच्या कदमवाडी येथील कार्यालयावर दगडफेक केली. या हल्ल्यामुळे कदम यांचे कार्यकर्तेही संतप्त झाले. त्यांच्या सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तलवारी, दांडकी, दगड घेऊन लाटकर यांच्या विचारेमाळ येथील संपर्क कार्यालयासह नक्षत्र पार्क कदमवाडी येथील बंगल्यावर दगडफेक करून हल्ला चढविला. लाटकर यांची इनोव्हा गाडी तोडफोड करून रस्त्यावरच उलटून टाकली. यामध्ये लाटकर यांच्या आईसह चार महिला जखमी झाल्या. विचारेमाळ-कदमवाडी परिसरात सुमारे दोन तास हा राडा सुरू होता. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. शाहूपुरी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करून पांगविले.

महापालिका निवडणुकीत शाहू कॉलेज-विचारेमाळ प्रभागातून राष्ट्रवादी पक्षातून राजू लाटकर यांची पत्नी सूरमंजिरी तसेच भाजप-ताराराणी आघाडीतून शुभांगी रमेश भोसले या निवडणूक लढवीत आहेत, तर शिवाजी पार्क प्रभागातून राष्ट्रवादीतून लाटकर व त्यांच्या विरोधात भाजप-ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. येथे चुरशीची लढत होत आहे. आज सोमवारी राजू लाटकर यांना मारहाणीचा प्रयत्न झाल्याचे समजताच लाटकर यांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत कदम यांच्या कदमवाडी येथील संपर्क कार्यालयाची व बाहेर लावलेल्या दुचाकी गाड्यांची मोडतोड केली. सत्यजीत कदम यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यांने त्यांचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात जमा झाले. या कार्यकर्त्यांनी लाटकर यांचे घर व कार्यालयाकडे कूच केली.
राजू लाटकर हे वृंदावन हौसिंग सोसायटी शिवाजी पार्क येथे राहतात. त्यांचे आई-वडील, भाऊ हे नक्षत्र पार्क, कदमवाडी येथे राहतात. दुपारी लाटकर इनोव्हा बंगल्यासमोर पार्किंग करून शिवाजी पार्क येथे गेले. यावेळी घरात आई-वडील, भाऊ, वहिनी, पत्नी व लहान मुले होती. यावेळी सव्वातीनच्या सुमारास कदम यांचे दीडशे कार्यकर्ते बंगल्यावर चाल करून आले. बंगल्याच्या काचांवर मोठ-मोठे दगड फेकले. अचानक झालेल्या हल्ल्याने घरातील महिला आरडाओरडा करू लागल्याने कार्यकर्त्यांनी बंगल्यासमोरील इनोव्हाची तलवारी, दगड, दांडक्याने जोरदार तोडफोड करीत ती उलटून टाकली. यावेळी लाटकर यांच्या वडिलांनी मोबाईलवरून पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीस येईपर्यंत कार्यकर्ते तोडफोड करून निघून गेले होते. यावेळी लाटकर यांच्या घरातील लहान मुले बिथरून आक्रोश करीत होती.
आईसह चार महिला जखमी
यानंतर कदम यांच्या समर्थकांनी लाटकर यांचे विचारेमाळ येथील संपर्क कार्यालयावर चाल केली. येथील संगणक, टेबल-खुर्च्या, कुंड्यांची नासधूस केली. यावेळी कार्यालयात बसून असलेल्या मुमताज नूरमुहमद्द शेख (वय ४०) यांच्या डोक्यात दगड लागून त्यांना गंभीर दुखापत झाली, तर अर्चना अविनाश सकट (४०), बिबी वाल्मीक गायकवाड (३६), अनिता रमेश पाटील (४०) या जखमी झाल्या. तसेच लाटकर यांच्या बंगल्यावरील हल्ल्यामध्ये त्यांची आई अंजली भरत लाटकर (६५) या जखमी झाल्या. त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी जादा पोलीस बंदोबस्त मागवून घेतला. शहरातील चारही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करून पांगविले. त्यानंतर सुहास लटोरे, सुनील कदम, सत्यजित कदम हे फिर्याद देण्यास शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना रोखले. सुरुवातीस राजू लाटकर यांची फिर्याद घेऊन झाल्यानंतर तुम्हाला निरोप दिल्यानंतर तुम्ही या, असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. त्यावर लटोरे, कदम हे कार्यालयात बसून राहिले.
पोलीस ठाण्यास घेरावो
राजू लाटकर यांना मारहाण झाली असून ते शाहूपुरी पोलीस ठाण्यात आहेत, असे विचारेमाळ परिसरात समजताच दोनशेपेक्षा जास्त कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर जमले. यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वार बंद करून कार्यकर्त्यांना बाहेर उभे केले. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला चारीही बाजंूनी घेरावो घालून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना लाठीमार करून पांगविले.


या निवडणुकीत अनेक प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहूनच पराभव समोर दिसत असल्याने मला गाडी अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. स्वत:ला नेते म्हणविणारेच त्यामध्ये पुढे होते. भाजपच्या संगतीला लागून ताराराणी आघाडीच्या नेत्यांना आतापासूनच सत्तेची धुंदी चढली आहे. ते कोल्हापूरचा बिहार करायला निघाले आहेत. राजकीय कार्यकर्ता म्हणून माझ्यावर हल्ला झाला हे समजू शकतो; परंतु माझ्या कुटुंबीयांना लक्ष्य केले.
- राजू लाटकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस


मुश्रीफ-नाना कदम यांच्यात खडाजंगी
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर व नगरसेवक सत्यजित कदम यांच्या समर्थकांत झालेल्या धुमश्चक्रीनंतर आमदार हसन मुश्रीफ व कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. एकेरी शब्दांत दोघांनीही जाब विचारल्याने घटनास्थळी कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांनाही बाजूला केल्याने पुढील अनर्थ टळला.
शिवाजी पार्क येथे राजू लाटकर व सुनील कदम, सुहास लटोरे यांच्यात झालेल्या वादावादीचे पडसाद दिवसभर शहरात उमटले. दुपारी सदर बाजार व कदमवाडी येथील दोन्ही गटांच्या कार्यालयांची तोडफोड झाल्यानंतर घटनास्थळी आमदार हसन मुश्रीफ व प्रा. जयंत पाटील आले होते. राजू लाटकर यांच्या घरी भेट देऊन ते सत्यजित कदम यांच्या कार्यालयासमोर जात असताना प्रा. पाटील हे गाडीतून उतरून ‘कोण रे तो?’, असे मोठ्या आवाजात ओरडू लागले. त्यांच्या पाठोपाठ आमदार मुश्रीफही गाडीतून उतरले आणि त्यांनीही ‘कोण रे तो, कोण रे तो... ’ असा आवाज देण्यास सुरुवात केल्याने वातावरण एकदम तंग झाले. कदम समर्थकांनीही ‘तू कोण आहेस, त्याला धरा’, अशी चेतावणी दिल्याने एकच गोंधळ उडाला. गोंधळातच आमदार मुश्रीफ यांच्या गाडीवर पहिल्यांदा खडी फेकण्यात आली आणि नंतर दगडफेकीला सुरुवात झाल्याने परिस्थिती आवाक्याबाहेर गेली. कदम समर्थक आक्रमक झाल्याने परिस्थिती ओळखून सत्यजित कदम बाहेर आले आणि त्यांनी समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही समर्थकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कदम यांनी समोर येत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सत्यजित कदम यांच्याकडे पाहत आमदार मुश्रीफ यांनी रागाने
‘ये नाना, हे तुला शोभतं का? काय चालवलेस?’ असे सुनावल्यानंतर पुन्हा वातावरण तणावपूर्ण बनले. अखेर कदम यांनी, ‘नंतर बघूया, साहेब तुम्ही येथून जावा’, असे सांगितल्यानंतर मुश्रीफ व प्रा. जयंत पाटील यांना त्यांच्यासोबत असलेले समर्थक गाडीत बसवून घेऊन गेले.


मी पहिल्यापासून सांगत होतो, ताराराणी आघाडी गुंड, मटका-जुगाराची आहे. महापालिका निवडणुकीत आपला टिकाव लागणार नाही हे समजल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित कट आहे. त्यांचा मी निषेध करतो.
- आमदार हसन मुश्रीफ


राष्ट्रवादीचे लोक वैफल्यग्रस्त आहेत. कदमवाडी येथील लोक गुण्या-गोविंदाने राहत होती. त्यांना भडकाविण्याचा प्रयत्न केला आहे. आ. मुश्रीफ यांचा काहीही संबंध नसताना ते याठिकाणी आले हे चुकीचे आहे.
- सत्यजित कदम

Web Title: 'Tararani' -Radha in the NCP, Khadajangi between Mushrif-Nana Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.