भाजपकडून विशिष्ठ जाती-धर्मांच्या लोकांना लक्ष्य
By admin | Published: October 26, 2015 11:57 PM2015-10-26T23:57:04+5:302015-10-27T00:05:51+5:30
इचलकरंजी शहर कॉँग्रेसची टीका: समाजकंटकांवर कारवाई करा
इचलकरंजी : ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देणाऱ्या भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. हरियाणातील सुनपेड येथील दलित कुटुंबीयांची हत्या आणि दादरी येथील अखलाक या मुस्लिम व्यक्तीची हत्या त्याचेच द्योतक आहे. या दोन्ही घटनांना केंद्रातील सत्ताच जबाबदार आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनांची सखोल चौकशी करून समाजकंटकांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सोमवारी कॉँग्रेस समितीचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे केली.
शहर कॉँग्रेस समितीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जिरंगे यांची भेट घेतली. हरियाणा राज्यातील वल्लभगड-सुनपेड या गावातील एका दलित कुटुंबाला घरात कोंडून घर पेटवून देत त्यांना जाळून ठार मारण्यात आले. तर दादरी परिसरातील बिसहडा गावातील अखलाक नामक व्यक्तीची गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून ठेचून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांचा शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने तीव्र निषेध करून हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
याप्रसंगी नगरसेवक शशांक बावचकर, रवी रजपुते, संजय केंगार, आदिवासी संघटनेचे मोहन काळे, आदींनी सरकारवर टीका केली.
यावेळी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, सतीश डाळ्या, धोंडिलाल शिरगावे, अहमद मुजावर, समीर शिरगावे, कबनूरचे ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे, नगरसेवक अब्राहम आवळे, रत्नप्रभा भागवत, अमर कांबळे, के. के. कांबळे, महावीर कुरुंदवाडे, श्रीकांत कोरवी, रंगा लाखे, अजित मिणेकर, रमेश पाटील, आनंदा कोरे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)