‘तासगाव’साठी निविदाच नाही !
By admin | Published: June 13, 2015 12:31 AM2015-06-13T00:31:27+5:302015-06-13T00:50:00+5:30
सभासद-कामगारांची निराशा : राज्य बॅँक जाचक अटींवर ठाम
भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना एक वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी राज्य बॅँकेने काढलेल्या निविदेकडे इच्छुकांनी पाठ फिरविल्याचे शुक्रवारी अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. कारखाना विक्रीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल लागेपर्यंत बॅँक धोरणात कोणताही बदल करणार नसल्याचे बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले. त्यामुळे येत्या हंगामात कारखाना सुरू होण्याची आशा मावळली आहे. कारखान्यावर मालकी हक्क सांगणारा गणपती संघ या प्रक्रियेपासून चार हात दूरच राहिला आहे.
तूरची (ता. तासगाव) येथील तासगाव कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी राज्य सहकारी बॅँकेने निविदा जाहीर केली होती. त्यावर मुंबईच्या श्रीराज डेव्हलपर्स या संस्थेने कारखाना चालविण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवीत कोरी निविदा खरेदी केली होती. मात्र, निविदेमध्ये असणाऱ्या जाचक अटी शिथिल केल्या तरच कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते. श्रीराज डेव्हलपर्सचे मालक प्रमोद पाटील यांनी कारखान्याची पाहणी केली होती. यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीचा खर्च भाडेपट्ट्यातून वजा करावा, तसेच गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन शंभर रुपयांप्रमाणे भाडे आकारावे, अशी मागणी त्यांनी केली होती. कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा विचार करता कारखाना दीर्घ मुदतीने चालविण्यास द्यावा, अशीही त्यांची मागणी होती. मात्र, राज्य बँकेने ताठर भूमिका घेतल्याने त्यांनी निविदाच दाखल केली नाही. शुक्रवारी निविदेकडे सर्वांनीच पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)
न‘सोनहिरा’चाही बॅँकेशी पत्रव्यवहार
कारखाना चालविण्यास घेण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या सोनहिरा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने शुक्रवारी राज्य बॅँकेशी लेखी पत्रव्यवहार करून जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. एका गळीत हंगामासाठी किमान अडीच कोटी रुपये भाडे व प्रत्यक्ष गाळपानुसार प्रतिटन भाडे देण्यासाठी किंवा शासनाने ठरवून दिलेले भाडे देण्यास तयार असल्याचे ‘सोनहिरा’चे म्हणणे आहे. बॅँकेने या प्रस्तावास मान्यता दिल्यास तीन दिवसांत एक कोटीची बयाणा रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्यावर्षी ‘सोनहिरा’ने भरलेली २५ लाखांची बयाणा रक्कम राज्य बॅँकेने परत
के ली नव्हती. यंदा तर निविदेची बयाणा रक्कम एक कोटी असून, पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेता निविदा भरण्याचे धाडस भल्याभल्या संस्थांनीही केले नाही.
प्रशासक मंडळ धोरणांवर ठाम
तासगाव कारखान्याबाबतचे प्रकरण जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. व्ही. के. अगरवाल हे बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष, जे. एस. सहानी सचिव, तर प्रमोद कर्नाड व्यवस्थापकीय संचालक आहेत. या तिघांच्या प्रशासकीय मंडळाने ठरविलेल्या धोरणानुसार कारखाना फक्त एकाच गळीत हंगामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, कोणत्याही अटी शिथिल करणार नसल्याची भूमिका कर्नाड यांनी मांडली.
बॅँकेने फेरविचार करावा
कारखाना दुरुस्तीसाठीचा खर्च अंदाजे पाच ते सहा कोटी असून, वर्षभराचे किमान भाडे ६ कोटी ५० लाख रुपये होते. कारखाना सुरू करायचाच असेल तर राज्य बॅँकेने पुन्हा एकदा सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रस्तावावर विचार करावा, अशी मागणी तासगाव कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.