टस्कर दाजीपूर अभयारण्यात आश्रयाला
By admin | Published: February 15, 2015 12:37 AM2015-02-15T00:37:58+5:302015-02-15T00:37:58+5:30
ऊस, केळी पिकांचे नुकसान : परिसरात भीतीचे वातावरण; सतर्कतेचा इशारा
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील भुदरगड हद्दीजवळच्या वाकीघोल परिसरात काल शुक्रवारी रात्री एका टस्कर हत्तीचे आगमन झाले. दुबळेवाडी येथील बाळू कृष्णा दळवी यांच्या शेतातील ऊस व केळीचे प्रचंड नुकसान करून सकाळी अभयारण्यात त्याने आश्रय घेतला. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर वनविभाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भुदरगडमधील वासनोली, कारिवडे, बारमाचा सडा मार्गे आलेला टस्कर दुबळेवाडी येथील शेतात असल्याचे रात्री साडेअकरा वाजता लोकांच्या लक्षात आले. फटाके, ढोल यांचा आवाज करून त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने दाद दिली नाही. रात्रभर दळवी यांच्या पिकांचा त्याने फडशा पाडला. या परिसरातच गस्तीसाठी फिरणारे विभागीय वनाधिकारी एल. एस. झुरे, वनक्षेत्रपाल एस. एस. पाटील, वनपाल अमोल शिंदे, जी. एस. काशिदकर, कर्मचारी बाळू केसरकर यांनी या ठिकाणी धाव घेऊन लोकांना शांत केले.
शनिवारी सकाळी हा टस्कर जवळच्या राधानगरी अभयारण्यात शिरला. तो पुन्हा शेतवडीत व गावात परतण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन्यजीव विभागाने या परिसरातील ग्रामपंचयतींना तसे कळवले असून, शेतात जाताना सावधानता बाळगावी, असा सल्ला दिला आहे.
पाच वर्षांपूर्वी याच परिसरातून एका टस्कराचे आगमन झाले होते. तो थेट राधानगरी, हसणे परिसरात आला होता. याचवेळी एका वनमजुराला त्याने ठार केले होते. नंतर काही दिवसांनी काळम्मावाडी मार्गावरील जंगलात त्या हत्तीचा न्युमोनियाने मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी