हॉटेलिंगचा आस्वाद अजूनही ‘पार्सल’वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:30+5:302021-06-29T04:17:30+5:30

कोरोनासारख्या अदृश्य विषाणूने रसिक खवय्यांची उदरभरण करणाऱ्या अन्नपूर्णेच्या या ठिकाणांना कुलूप लावले असल्याने केवळ चमचमीत चव चाखणाऱ्या जिभेचीच गैरसोय ...

The taste of hotelling is still on parcels | हॉटेलिंगचा आस्वाद अजूनही ‘पार्सल’वरच

हॉटेलिंगचा आस्वाद अजूनही ‘पार्सल’वरच

कोरोनासारख्या अदृश्य विषाणूने रसिक खवय्यांची उदरभरण करणाऱ्या अन्नपूर्णेच्या या ठिकाणांना कुलूप लावले असल्याने केवळ चमचमीत चव चाखणाऱ्या जिभेचीच गैरसोय झालेली नाही, तर हा व्यवसाय करणाऱ्या सुमारे दोन हजारांहून अधिक हॉटेल व्यावसायिक आणि त्यावर रोजीरोटी अवलंबून असलेल्या सुमारे चाळीस हजारांहून अधिक कर्मचारी, पूरक व्यावसायिक यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे सर्वांनाच हा व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने सुरू व्हावा, तो तेजीत चालावा यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सात महिने आणि दुसऱ्या लाटेत तीन महिने व्यवसाय बंद राहिल्यामुळे सगळ्यांचेच कंबरडे मोडले आहे. मोठ मोठे हॉटेल व्यावसायिक घाईला आले आहेत. ज्यांनी दोन वर्षांपूर्वी नव्याने व्यवसाय सुरू केला. व्यवसायात गुंतवणूक केली ते तर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जाचे हप्ते कसे भरायचे, लाइट पाण्याची बिले कशी भरायची, याची चिंता लागून राहिली आहे. काही व्यायसायिकांनी चालवायला घेतलेली हॉटेल पुन्हा मूळ मालकाकडे परत केली आहेत. इतके मोठे संकट या व्यवसायासमोर यापूर्वी कधीच आले नव्हते. त्यामुळे हा व्यवसाय अभूतपूर्व संकटात सापडला आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासन सोमवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, खानावळी सुरू करण्यास परवानगी देईल या अपेक्षेत असलेल्या हॉटेल मालकांसह खवय्यांचाही मोठा अपेक्षाभंग झाला. आता आणखी काही दिवस तरी हा व्यवसाय बंद राहणार असून नागरिकांना सुद्धा पार्सलवरच समाधान मानावे लागणार आहे.

कोट - १

प्रशासनाने पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी त्यास फारसा प्रतिसाद नाही. गिऱ्हाईक किती येणार, त्यांना काय लागणार आहे, याचा अंदाज नसतो. पार्सलसाठी कर्मचारी ठेवणे, पॅकिंगचा खर्च यामुळे पार्सल देणे परवडत नाही. प्रशासनाने काही अटीवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी.

-उज्ज्वल नागेशकर

कोट -२

कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बसला आहे. पर्यटन थांबले आहे. परदेशी पर्यटक येणे बंद आहे. पूर्वापार व्यवसाय करणारे आर्थिक संकटात आहेत. या व्यवसायात नवीन आलेल्यांची तर फार मोठी कोंडी झाली आहे. जरी हॉटेल्स सुरू झाले तर सावरण्यास पुढे आणखी काही महिने लागतील.

-आनंद माने.

कामगाराचा कोट - १

हॉटेल बंद राहिल्यामुळे काम थांबविले आहे. रोजीरोटीचा प्रश्न गंभीर आहे. गावाकडे जाऊन काही करावे म्हटले तर येथेही काही काम नाही. आता कोणाच्या तरी शेतात मजुरीवर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

-कृष्णात रावळ.

कामगाराचा कोट - २

गावाकडे कामधंदा नाही म्हणून शहरात आलो; पण आता गेल्या वर्षभरापासून काम नाही. घरात बसून आहे. संसार चालविण्याची कसरत सुरू आहे. कधी एकदा हॉटेल्स सुरू होतात याकडे लक्ष लागले आहे.

-संतोष पदमले.

पॉइंटर -

- जिल्ह्यातील लहान मोठी हॉटेल, उपहारगृहे, खानावळी, लॉजिंग - २०००

- या व्यवसायावर अवलंबून असणारे कर्मचारी, पूरक व्यावसायिक - ४० हजार.

Web Title: The taste of hotelling is still on parcels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.