कोल्हापूरच्या उद्योगवाढीत टाटा ग्रुपचा हातभार, रतन टाटांनी ईगल रेडिओ हाऊसला दिली होती भेट
By पोपट केशव पवार | Published: October 11, 2024 11:52 AM2024-10-11T11:52:20+5:302024-10-11T11:53:21+5:30
निम्म्यापेक्षा जास्त कंपन्यांना मिळते काम
पोपट पवार
कोल्हापूर : देशातील असे एक शहर नसेल जिथे टाटा ग्रुपचे उत्पादन पोहोचले नाही. आपल्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून लाखो जणांना रोजगार मिळवून देत देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या टाटा ग्रुपने कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासातही मोठे योगदान दिले आहे.
विशेषत: रतन टाटा यांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र सर्वाधिक भरभराटीला आले. टाटा ग्रुपच्या ट्रकपासून ते कारपर्यंतच्या सर्वच उत्पादनांमधील पार्ट कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांकडून पुरवले जातात. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश उद्योजकांचे टाटा ग्रुप आणि रतन टाटा यांच्याशी व्यावसायिक आणि भावनिक ऋणानुबंध निर्माण झाले होते.
टाटा कंपनीची जी जी वाहने आहेत त्यातील सर्वच वाहनांचे कमी-अधिक पार्ट कोल्हापुरात तयार होतात. येथील निम्म्यापेक्षा जास्त कंपन्या टाटा उद्योग समूहाच्या वेंडर असल्याने कंपन्यांना काम मिळण्याबरोबरच रोजगार वाढीलाही मोठी मदत झाली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील उद्योजकांनी त्यांच्या आठवणींचा पट उलगडला.
जिल्हा सर्वांत मोठा पुरवठादार
टाटा ग्रुपच्या वाहन क्षेत्रातील सर्वच उत्पादनांसाठी जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडून पार्ट पुरविले जातात. यामुळे येथील फौंड्री आणि इंजिनिअरिंग संबंधित उद्योगाला खऱ्या अर्थाने बूस्टर मिळाला. यातून आर्थिक सुबत्तेसह हजारो जणांना रोजगार मिळण्यासही मदत झाली आहे.
इस्लामपूरमध्ये झाली होती भेट
रतन टाटा हे १० नोव्हेंबर २०१३ रोजी इस्लामपूर येथील आर.आय.टी.कॉलेज येथे पदवीदान समारंभासाठी आले होते. त्यावेळी कोल्हापुरातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती.
ईगल रेडिओ हाऊसला भेट
४५-५९ वर्षांपूर्वी रतन टाटा कोल्हापुरात आले होते. कसबा गेट, महाद्वार रोड येथील ईगल रेडिओ हाऊसला रतन टाटा यांनी भेट दिली होती. तेव्हा ते नेल्को या टाटा समूहाच्या कंपनीचे प्रतिनिधित्व करत होते. शिवप्रसाद नागपूरकर आणि त्यांचे पुत्र विजय नागपूरकर यांनी टाटा यांचे स्वागत केले होते. आज ईगल रेडिओ हाऊस नागपूरकर श्रवण सेवा या नावाने ओळखले जाते.
घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टकडे टाटा मोटर्स यांची डीलरशिप असल्याने कॉन्फरन्सच्या निमित्ताने रतन टाटा यांच्याशी अनेकवेळा संवाद साधण्याचा योग आला. प्रचंड बहुआयामी असे ते व्यक्तिमत्त्व होते. संयम आणि नम्रता या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या. - तेज घाटगे, मॅनेजिंग डायरेक्टर, माई टीव्हीएस.
कोल्हापूरच्या उद्योगवाढीत टाटा ग्रुपचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. टाटाच्या ट्रकपासून कारपर्यंतचे पार्ट कोल्हापुरातून पुरवठा केले जातात. यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास टाटा ग्रुपमुळेच झाला आहे हे विसरता येणार नाही. - सुरेंद्र जैन, अध्यक्ष स्मॅक, शिरोली, कोल्हापूर.
कोल्हापुरातील निम्म्यापेक्षा जास्त उद्योग टाटा औद्योगिक कंपन्यांचे वेंडर आहेत. त्यामुळे कोल्हापूरची इंडस्ट्री माेठी होण्यात टाटा समूहाचा मोठा वाटा आहे. रतन टाटा आपल्यातून गेले याचे दुःख आहेच. पण त्यांनी देशात व परदेशात उभे केलेले औद्योगिक विश्व यावर आपल्या येथील उद्योजकांना वेगवेगळ्या क्षेत्रात कामे उपलब्ध करून पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे स्मरण अखंडित राहील. -बाबासाहेब कोंडेकर, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन.