तावडे हॉटेलप्रश्नी कायद्याची पायमल्ली : दिलीप देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:01 AM2018-04-17T01:01:16+5:302018-04-17T01:01:16+5:30
कोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील
कोल्हापूर : शासनाने निर्माण केलेले कायदे, प्रसिद्ध केलेली परिपत्रके यांची तावडे हॉटेल परिसरप्रश्नी शासनाकडूनच पायमल्ली होत असल्याचा आरोप करत कायदे पाळायचे नसतील तर महापालिका बरखास्त करून सर्व कामकाज राज्य सरकारने पाहावे, असे आवाहन प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
देसाई म्हणाले, शहरात अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात असताना तावडे हॉटेल परिसरातील धनदांडग्यांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामधारकांवर कायद्याने गुन्हे नोंदविणे क्रमप्राप्त असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नोटिसा रद्दबादल ठरवून बांधकामांना परवानगी देत आहेत. शासनानेच निर्माण केलेल्या कायद्यात शासन ढवळाढवळ करीत असेल तर महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी देसाई यांनी केले.
वळवींच्या कार्यकाळातील सनदी रद्द करा
सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी डी. डी. वळवी यांच्या सन २००४ ते २००८ या कार्यकाळातील किरकोळ अर्ज, औद्योगिक वापरास परवानगी, बिनशेती एस.आर. असे आदेश दिले; पण एकाच क्रमांकाचे दोन, एकाच गटाचे दोन आदेश अथवा खरी नक्कल असे खोटे शिक्के मारून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दस्त नोंदविण्यात आले. त्यामुळे या कालावधीतील दस्त नोंदवू नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तावडे हॉटेल परिसरात अनेक परवानग्याही त्यांनीच दिल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगून वळवी यांनी दिलेल्या सनदी रद्द कराव्यात, अशी मागणी देसाई यांनी केली.