ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून नरंदे ग्रामपंचायतीची करवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:06+5:302021-03-30T04:13:06+5:30
नरंदे ग्रामपंचायतीने करवसुली करण्याची परंपरा सतत पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. मार्च महिना आला की सगळीकडेच वसुलीची धांदल ...
नरंदे ग्रामपंचायतीने करवसुली करण्याची परंपरा सतत पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला आहे. मार्च महिना आला की सगळीकडेच वसुलीची धांदल पाहायला मिळते; पण येथे मात्र सहज, निवांतपणे वसुली होत असते. आतापर्यंत ८० टक्के वसुली झाली आहे. ही वसुली पहिली तर भरघोस प्रतिसादच म्हणावा लागेल. बहुतांश गावांत वसुलीची पद्धतच ढेपाळलेली दिसते. अनेकविध प्रयोग करून शक्कल लढवून गावपातळीवर वसुली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह कर्मचारी वसुलीसाठी जनतेच्या दारात जात आहेत. दवंडी देण्यात येत आहे. गावातून लोकवाद्य वाजवत जागृती केली जात आहे. पाण्याच्या चावीचे कनेक्शन तोडण्याची मोहीम अनेक गावांत प्राधान्याने सुरू आहे प्रसंगी यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात असल्याचे पाहावयास मिळते.
घराचा उतारा, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, रहिवाशी दाखला अशी कागदपत्रे कर भरल्याशिवाय दिली जात नाहीत. अशा विविध प्रकारच्या आयडिया वसुलीसाठी अनेक ग्रामपंचायती वापरत आहेत तरीसुद्धा वेग वाढत नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे.