ग्रामीण भागातील जनतेवर कराचा बोजा पडू देणार नाही
By Admin | Published: August 15, 2015 12:42 AM2015-08-15T00:42:59+5:302015-08-15T00:42:59+5:30
दीपक केसरकर यांची माहिती : चंदगडच्या पर्यटनाला निधी देण्याची ग्वाही; चंदगड पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक
चंदगड : शहराजवळच्या गावासाठी आकारण्यात येणारी घरपट्टी ही शहरात आकारली जाते तेवढीच आकारली जात होती. याचा भुर्दंड ग्रामीण भागातील नागरिकांना बसत होता. मात्र, राज्य सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. यासाठी नागरिकांकडून हरकती मागविण्यात येत आहे. या हरकतीवर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊन अधिकारांचा बोजा नागरिकांवर पडू देणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.चंदगड पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सभापती ज्योती पवार पाटील यांनी स्वागत करून तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली.केसरकर म्हणाले, चंदगडच्या पर्यटन व्यवसायाच्यादृष्टीने वाव आहे. त्यासाठी जंगल परिसरातील गावामध्ये वनहक्क समित्या स्थापन करून पर्यटनाचा कार्यक्रम पारगड परिसरात सुरू करा. चौकूळ, आंबोली, मोर्लेकडून पारगडकडे येणारे रस्ते जोडून लवकरच वाहतूक सुरु होईल. मोर्ले रस्त्याला ५ कोटी व चंदगड-इसापूर-पारगड रस्त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.महाराष्ट्रातील ८० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागात राहणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे. इस्राईलमध्ये शेतीबाबत जे प्रयोग करण्यात आले त्याचा अभ्यास करून त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी शासन कार्यक्रम राबवणार आहे. काजू बोंडापासून ज्यूस तयार करून ते कोठे वापरता येईल, यासंबंधी संशोधनाला चालना देणार आहे. प्रत्येक गावाला जोडण्यात येणारा मुख्य रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करणार असल्याचे सांगितले.यावेळी जि. प. महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती दीपक पाटील यांनी शासनाने १४व्या वित्त आयोगाची निधी थेट ग्रामपंचायतींना दिल्याने पं. स. व जि. प.चे काय काम उरले नाही. या योजनेतील निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा असल्याने जि. प. व पं. स. सदस्यांना विकासासाठी निधी मिळत नसल्याने सदस्यांविरोधात लोकांच्या तक्रारी वाढणार आहेत. त्यामुळे या निधीबाबत शासनाने फेरविचार करावा.
‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील यांनी सहकार तत्त्वावर सुरू करण्यात आलेला दौलत कारखाना सहकारातच राहावा यासाठी शासनाने दौलतच्या लिलावास स्थगिती द्यावी, अशी मागणी करून एव्हीएच प्रकल्प तालुक्यातून कायमचा हद्दपार करण्याची मागणी केली.
माजी सभापती संग्राम पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी करून चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्याचे पालकत्व केसरकर यांनी घ्यावे व भागाचा कायापालट करावा, अशी विनंती केली.
यावेळी प्रा. एन. एस. पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांनी प्रत्येक विभागाची माहिती सादर केली.
यावेळी नागरिकांनी एव्हीएच, दौलतबाबत तसेच हत्ती, गवा आदी जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत व इतर कामांचे निवेदन केसरकर यांच्याकडे दिले.
जि. प. सदस्य राजेंद्र परीट, अनुराधा पाटील, कल्लाप्पा नाईक, प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, विद्याधर बागे, रघुवीर शेलार, बाळासाहेब कुपेकर, अनिल सुरूतकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुल्ले, प्रकल्प अधिकारी जगताप, व्ही. एस. घाटगे, ए. डी. कोष्टी, सी. जी. गुजर, एस. व्ही. सावळगी आदींसह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
संजय चंदगडकर यांनी सूत्रसंचालन केले. कक्ष अधिकारी व्ही. जी. नरवणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)