‘टीडीआर’प्रश्नी लवकरच तोडगा निघेल
By admin | Published: April 22, 2016 12:35 AM2016-04-22T00:35:42+5:302016-04-22T00:54:50+5:30
सतेज पाटील : ‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे रस्त्यावरील झाडांना पाणी देण्याच्या उपक्रमाला प्रारंभ
कोल्हापूर : शहराच्या विकासासाठी शासनाच्या नवीन नियमानुसार सहा आणि साडेसात मीटरच्या रस्त्यांवरील बांधकामांना टीडीआर वापरण्यास परवानगी मिळाली पाहिजे. ‘टीडीआर’प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व नगरविकास खात्याच्या सचिवांची आम्ही भेट घेतली आहे. त्यामुळे लवकरच ‘टीडीआर’बाबत तोडगा निघेल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.
शहरात ५० किलोमीटरच्या रस्त्यावरील झाडांना सांडपाण्यावर पुनर्रप्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे घातले जात आहे. क्रिडाईच्या या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठ-पोस्ट कार्यालय चौकातील बगीचाला आमदार पाटील यांच्या हस्ते पाणी घालण्यात आले. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, आयुक्त पी. शिवशंकर, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर हे आपल्या सर्वांचे ब्रँड अॅम्बॅसडर असल्याने त्याला स्वच्छ-सुंदर करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यंदा भीषण पाणीटंचाई आहे. पण, यातही शहरातील सांडपाण्यावर पुनर्रप्रक्रिया केलेले पाणी रस्त्यांवरील झाडांना देण्याचा क्रिडाई कोल्हापूरचा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.
महापौर रामाणे म्हणाल्या, रस्त्यांवरील झाडांना पाणी देण्याचा उपक्रम राबवून क्रिडाई कोल्हापूरने महानगरपालिकेला मदतीचा हात दिला आहे. आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, क्रिडाई कोल्हापूरचा हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे. या संघटनेप्रमाणे अन्य संघटनांनीही शहर विकासाला हातभार लावावा.
यावेळी सभागृह नेता प्रवीण केसरकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगर रचनाचे सहायक संचालक धनंजय खोत, क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजीव परीख, क्रिडाई कोल्हापूरचे माजी अध्यक्ष राम पुरोहित, गिरीश रायबागे, विद्यमान उपाध्यक्ष सुजय होसमणी, खजानीस चेतन वसा, सदस्य नितीन जिरगे, विक्रांत जाधव, प्रमोद साळुंखे, हेमांग शहा, सत्यजित कापडे, संग्राम दळवी, पवन जमादार, विजय माणगांवकर, कृष्णा पाटील, प्रकाश मेडशिंगे, आदी उपस्थित होते. सचिव विद्यानंद बेडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)