उन्मत्त सरकारला धडा शिकवा

By admin | Published: April 26, 2017 01:02 AM2017-04-26T01:02:04+5:302017-04-26T01:02:04+5:30

पृथ्वीराज चव्हाण : संघर्ष यात्रा कोल्हापुरात; आता मंत्रालयाला घेराव घालणार : तटकरे

Teach a lesson to the frantic government | उन्मत्त सरकारला धडा शिकवा

उन्मत्त सरकारला धडा शिकवा

Next

कोल्हापूर : सर्व बाजूंनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या राज्यातील सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष यांच्यातर्फे आयोजित संघर्ष यात्रेनिमित्त मंगळवारी दसरा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सर्वच वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.
आपल्या भाषणात चव्हाण पुढे
म्हणाले, सरकारने सुरुवातीपासून या संघर्षयात्रेची टिंगल केली. शेतकऱ्यांनी चैनी करून कर्जे थकविली नाहीत. सुरुवातीला काही वर्षे पाऊस झाला नाही. दुष्काळ पडला. शेतकरी अडचणीत आला. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. पीक चांगलं आलं. काहीतरी पदरात पडेल म्हणून शेतकरी आपलं पीक घेऊन बाजारात आला. मात्र, कोणताही विचार न करता केलेल्या नोटाबंदीमुळे त्याचा मालच कुणी घेतला नाही.
शेतकऱ्यांपेक्षा शहरातील ग्राहकांची संख्या अधिक असल्याने मतांचे राजकारण केले जात आहे. म्हणूनच साखरेला चांगले भाव मिळणार याची
चिन्हे दिसत असताना पाच लाख टन कच्ची साखर आयात केली गेली आणि साखरेचे दर कमी झाले. लाखो क्विंटल तूर आता मराठवाड्यात खरेदीअभावी पडून आहे. कांदा, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत आला आहे. उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असताना महाराष्ट्रावर हा अन्याय कशासाठी? मंत्रालयात दाद मागायला येणाऱ्या शेतकऱ्याला झोडपणाऱ्या या सरकारला जाब विचारण्यासाठी, खाली खेचण्यासाठी आता पेटून उठा; नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही आणि सरकारने कांद्याला प्रतिकिलो एक रुपया अनुदान दिले आहे. मराठवाड्यातील तूर खरेदी केंद्रे बंद केली आहेत. पेट्रोलचे दर वाढविले आहेत. वीजदरात वाढ केली आहे; त्यामुळे आता तेथे आंदोलने उभारावी लागतील. आता यापुढचा टप्पा म्हणजे कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या मंत्रालयाला घेराव घातला जाईल.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी जर कोसळला तर त्याला कोण उभे करणार? शेतकरी कोसळला तर भारत उभा राहू शकत नाही. हिमालय जरी मदतीला आला नाही तरी आपल्या मुठी घट्ट करून या संकटांना तोंड दिले पाहिजे. माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले, सामान्यांना कसं खेळवायचं याची विद्या अवगत असणारे पंतप्रधान आहेत. आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते. आता त्यांची तरुण मुलं मुली आत्महत्या करायला लागली आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारचं हे अपयश आहे. यावेळी आमदार विद्या चव्हाण, प्रवीण गायकवाड यांचीही भाषणे झाली.
व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, हसन मुश्रीफ, रोहिदास पाटील, आमदार मोहन कदम, संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, ‘स्थायी’चे सभापती डॉ. संदीप नेजदार, सरलाताई पाटील, संगीता खाडे, अंजना रेडेकर, ‘आर.पी.आय.’चे डी. जी. भास्कर, शेकापचे बाबासाहेब देवकर, बाबूराव कदम यांच्यासह संयोजक पक्षांचे मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.


कोल्हापूर जिल्ह्यात ७३ आत्महत्या
या सभेत सर्वच वक्त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली. ‘सधन शेतकऱ्यांना कर्जमाफी कशासाठी?’ या महसूलमंत्र्यांंच्या वक्तव्याचा समाचार यावेळी घेण्यात आला. माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांनी आकडेवारी काढून बघावी. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी काहींच्या वारसांना शासनाने पैसेही दिले आहेत. ते सर्वजण सधन असते तर या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का? हा माझा पालकमंत्र्यांना सवाल आहे.

बदललेले अजितदादा
एरवी तराटणी देणाऱ्या अजित पवार यांच्या स्वभावात बदल झाल्याचे यावेळी अनेकांना पाहावयास मिळाले. फोटो काढून घेण्यासाठी युवकांचा आग्रह मान्य करतानाच सेल्फी घेताना एका युवकाचा मोबाईल खाली पडला. तो उचलून घेत पुन्हा त्याला सेल्फी घेण्यासाठी दादांनी वेळ दिला.


पानसरेंची आठवण येते
या दसरा चौक मैदानावर येताना कॉ. गोविंद पानसरे यांची आठवण येते. शिवाजी महाराज वेगळ्या पद्धतीने मांडले जात असताना त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पाच रुपयांच्या पुस्तकातून मांडलेले शिवाजी वेगळे होते; परंतु त्यांना
गोळ्या घालणारी पिलावळ कोल्हापुरात वाढते, हे अशोभनीय असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Web Title: Teach a lesson to the frantic government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.