Crime News Kolhapur: शाळेबाहेर बोलवून शिक्षकावर कोयत्याने हल्ला, शिक्षक गंभीर जखमी; कदमवाडीत घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:21 PM2022-12-26T15:21:00+5:302022-12-26T15:59:37+5:30
विद्यार्थ्याला रागावल्याच्या कारणातून हल्ला झाल्याचा संशय
उद्धव गोडसे
कोल्हापूर: कदमवाडी येथे माझी शाळा येथील शिक्षक संजय आनंदा सुतार (वय ४५, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांच्यावर चार ते पाच जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. आज, सोमवारी (दि. २६) दुपारी एकच्या सुमारास शाळेतलगत असलेल्या गल्लीत ही घटना घडली. या हल्ल्यात शिक्षक संजय सुतार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक संजय सुतार हे कदमवाडीतील सुसंस्कार शिक्षण प्रसारक मंडळाच्या माझी शाळा या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारच्या सुमारास शाळेची पंधरा मिनिटांची सुट्टी झाल्यानंतर शिक्षक संजय सुतार यांना एका तरुणाने शाळेबाहेर बोलवले. त्यावेळी चार ते पाच तरुणांनी सुतार यांच्यावर कोयत्याने वार केले, तसेच डोक्यात दगड घातला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सुतार रस्त्यावर कोसळताच खाल्लेखोर घटनास्थळावरून पळाले. परिसरातील नागरिकांनी जखमी सुतार यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून, पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. शिक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शाळेत सातवीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला रागावल्याच्या कारणातून संबंधित विद्यार्थ्यांच्या मोठ्या भावाने मित्रांसोबत संजय सुतार यांच्यावर हल्ला केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असून, काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.