नोकरभरतीमुळेच शिक्षक बँक आतबट्ट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:30+5:302021-09-07T04:29:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आपल्या सग्यासोयऱ्यांच्या सोयीसाठी सत्ताधारी मंडळींनी केलेल्या नोकरभरतीमुळेच प्राथमिक शिक्षक बँक आतबट्ट्यात आल्याचा आरोप शिक्षक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आपल्या सग्यासोयऱ्यांच्या सोयीसाठी सत्ताधारी मंडळींनी केलेल्या नोकरभरतीमुळेच प्राथमिक शिक्षक बँक आतबट्ट्यात आल्याचा आरोप शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील व सरचिटणीस प्रमोद तौंदकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. संगणक खर्चाच्या आडून संचालकांनी सभासदांच्या पैशांची उधळपट्टी केली असून, या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करण्यासाठी शाखानिहाय ऑनलाईन सभा घेण्याची मागणी केली. मात्र चुकीच्या कारभार झाकण्यासाठी ऑनलाइन सभेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे सभासदांना लाभांशवाटप केलेले नाही. ताळेबंदाला तरतूद केली आहे तर मग त्याचे काय झाले? सगेसोयऱ्यांच्या सोयीसाठी गरज नसताना नोकरभरती केली. याविरोधात पावणेचार हजार सभासदांच्या सहीचे निवेदन जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. प्रत्येक वर्षी नोकर पगारावरील खर्चात मोठी वाढ होत असून, शाखावार विचार केल्यास नफ्यापेक्षा तिपटीने पगारावर खर्च होत आहे. संगणकाकावर २३ लाख ९४ हजार खर्च झाला असून, लीज लाईनवर ७ लाख २५ हजार खर्च असा प्रत्येक संगणकाचा ३१ हजार २३१ रुपये देखभाल दुरुस्ती खर्च दाखवला आहे. या वेळी वर्षा केनवडे, दीपाली भोईटे, बाजीराव पाटील, विष्णू जाधव, शरद केनवडे, विठ्ठल भाट, राजू तौंदकर, प्रकाश पाटील, प्रमोद भांदिगरे आदी उपस्थित होते.
बँकेची निवडणूक स्वबळावरच
बँकेची आगामी निवडणूक शिक्षक समितीने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. समविचारी व बँकेचे हित जोपासणारी मंडळी सोबत येण्यास तयार असतील तर विचार करू, असे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.