शिक्षक बँक नोकर भरतीविरोधात मंगळवारी संप, बँक एम्प्लॉईज युनियनचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:09 PM2019-03-30T14:09:20+5:302019-03-30T14:11:12+5:30
कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांनी बँकेत अनावश्यक नोकरभरतीचा घाट घातला आहे. या संचालकांच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे मंगळवारी (दि. २) एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांनी बँकेत अनावश्यक नोकरभरतीचा घाट घातला आहे. या संचालकांच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे मंगळवारी (दि. २) एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याबरोबर २००० साली ‘सेवक मांड’ कराराच्या आधारे सदर नोकरभरती करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. यात १४४ कर्मचारी आवश्यक होते; परंतु २००० सालानंतर कमी झालेली सभासद संख्या व संगणक वापरामुळे रिझर्व्ह बँकेने २/३ कर्मचाऱ्यांत बँक चालेल, असे म्हटले आहे. त्याची अंमलबजावणी संचालकांनी केलेली नाही. त्यानुसार ९६ कर्मचाऱ्यांची संख्या भरते. सद्य:स्थितीत १०२ कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही नोकरभरतीचा डाव मांडला जात आहे.
एका बाजूला कर्मचाऱ्यांचे चार कोटींहून अधिक देणे देण्यास व्यवस्थापन असमर्थता दाखवीत आहे; तर दुसरीकडे बँकेवर नोकरभरतीचा बोजा लादला जात आहे. त्याचा परिणाम सभासदांच्या लाभांशवर होणार आहे. त्यामुळे संचालक स्वत:च्या स्वार्थापोटी सभासद, बँक व कर्मचारी यांच्या हिताचा बळी देत आहेत.
कर्मचाऱ्यांनी कष्टाने गतवर्षी बँक नफ्यात आणली असून सभासदांना ब ऱ्याच वर्षांनी प्रथमच लाभांश मिळाला आहे. युनियननेही ७५ कर्मचाऱ्यांचा ‘सेवक मांड ’प्रस्ताव सादर केला आहे. याचीही चर्चा नसल्यामुळे युनियनने सहायक कामगार आयुक्तांकडे धाव घेतली आहे. कर्मचारी ही नोकरभरती रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सभासद हे बँकेचे मालक असल्याने त्यांनीच नेमलेल्या संचालकांना त्यांनी जाब विचारावा, असेही आवाहन दिघे यांनी केले आहे. यावेळी सचिव एन. एस. मिरजकर, सचिव प्रकाश जाधव, प्राथमिक शिक्षक बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर भालकर, आनंदा घोरपडे, अनंत कुलकर्णी, आदी उपस्थित होते.