शिक्षकानं विद्यार्थिनींसोबत केलं अक्षम्य कृत्य, शेळेवाडीच्या माध्यमिक शाळेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:38 PM2023-01-30T22:38:58+5:302023-01-30T22:42:07+5:30
आज समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासुरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.
राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत वाईट वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ते गेल्या दोन वर्षांपासून येथे कार्यरत होते. नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्याने त्रास दिल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार एक महिन्यापूर्वी घडला आहे. आज समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासुरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा धक्कादायक प्रकार समोर आला.
हा शिक्षक 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थिनींच्या खांद्यावर हात ठेवणे, खिशात हात घालणे असे गैरवर्तन करत होता. या शिक्षकाच्या कृत्याची चर्चा महिनाभरापासून ग्रामस्थांमध्ये होती. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामस्थानी या संस्थेच्या कार्यालयात धाव घेतली. संस्थेने तत्काळ त्या शिक्षकाची बदली केली. त्यामुळे या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. इंग्रजी विषय शिकवणारे ते शिक्षक आहेत.. संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी संबंधित मुलींसह पालक आणि ग्रामस्थांमधून होत आहे.
गावातील शाळेत घडलेली घटना खरी आहे. याबाबत ग्रामस्थांनी संस्थेकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचे शेळेवाडीच्या सरपंच रिना पाटील यांनी सांगितले.
शिक्षकाची तात्काळ बदली -
काही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने संबंधीत शिक्षकाची बदली करून घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संबंधित शिक्षकाची सध्या सातारा जिल्ह्यात बदली केली आहे, अशी माहिती पोलीस पाटील श्रीपती पाटील यांनी दिली.
समुपदेशनातून प्रकार उघड -
शेळेवाडी येथील घडलेला प्रकार समुपदेशनाच्या निमित्ताने आज समजला मुलींनी धाडसाने या प्रकारास वाचा फोडली. त्या शिक्षकाची बदली झाली असली तरी यापुढेही, असे प्रकार होऊ नयेत, असे मुलींनी म्हटले आहे. प्रत्यक्षात ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनी गुड आणि बॅट टचचे महत्व समजावून देण्याऐवजी गैर कृत्य केल्यामुळे विकृती समोर आली आहे. याबद्दल संताप व्यक्त होत आहे. मुलींचे कौतूक केले पाहिजे की त्यांनी ग्रामीण भाग असूनही आपल्या बाबतीत घडलेला प्रकार समोर आणला मात्र त्याचा या शाळेच्या पटावर परिणाम होऊ नये, असे महिला समुपदेशक गीता हासुरकर यांनी म्हटले आहे.
संबंधीत घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिक्षकांकडून झालेल्या या कृत्याबद्दल कडक कारवाईची मागणी होत आहे.