शिक्षकांनी मारली शाळेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:32 AM2021-02-25T04:32:11+5:302021-02-25T04:32:11+5:30
सरूड : शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती विजय खोत व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी तालुक्यातील प्राथमिक शाळांना बुधवारी अचानक ...
सरूड : शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती विजय खोत व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी तालुक्यातील प्राथमिक शाळांना बुधवारी अचानक भेट दिली असता अनेक शिक्षकांनी गैरहजर राहत शाळेला दांडी मारल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . काही शाळा तर पूर्णपणे बंद असल्याचे या भेटीदरम्यान दिसून आले. या भेटीमुळे दांडीबहाद्दर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे. दरम्यान, या दांडीबहाद्दर शिक्षकांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती सभापती विजय खोत यांनी दिली. सभापती व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक दिलेल्या या शाळा भेटीची तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात बुधवारी दिवसभर चर्चा होती.
शाहूवाडी तालुक्यातील अनेक शिक्षक शाळेत वेळेवर हजर राहत नाहीत, तसेच काही जण दिवसभर शाळेतच नसतात, अशा अनेक तक्रारी सभापती विजय खोत, आणि गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे सभापती खोत व गटशिक्षणाधिकारी सरनाईक यांनी बुधवारी अचानक तालुक्यातील केंद्र शाळा पणुंद्रे, कडेवाडी, पाटेवाडी, केंद्रशाळा शिराळेतर्फे मलकापूर, पणुंद्रे पैकी शिंदेवाडी आदी शाळांना भेटी दिल्या. यामध्ये केंद्रशाळा पणुंद्रे या शाळेतीत चारही शिक्षक गैरहजर होते. ही शाळा साडेतीन वाजता बंद होती. कडेवाडी शाळेतील दोन्हीही शिक्षक गैरहजर होते. पाटेवाडी शाळाही पावणेचार वाजता बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. केंद्र शाळा शिराळे तर्फ मलकापूर या शाळेतील मुख्याध्यापक व एक शिक्षिका गैरहजर आढळून आले. पणुंद्रे पैकी शिंदेवाडी शाळेतील एक शिक्षिका गैरहजर होती.
या सर्व गैरहजर शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वतीने कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी दिली.