'गुरुजी'ची यंदा शंभर टक्के हजेरी; कोल्हापूर जिल्ह्यात सर्व रिक्त पदांवर शिक्षक नियुक्ती
By भीमगोंड देसाई | Published: May 30, 2024 03:46 PM2024-05-30T15:46:47+5:302024-05-30T15:47:11+5:30
..तर कदाचित संबंधित शिक्षकास अतिरिक्त होण्याचीही वेळ येणार
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांतील सर्व रिक्त पदांवर शिक्षक नियुक्त होणार आहेत. परिणामी वाड्या, वस्त्यांतील सर्व विद्यार्थ्यांना गुरुजी मिळणार आहेत. शासनाने नव्याने निवडलेल्या ५६३ शिक्षकांनाही रुजू होणार असल्याने रिक्त शिक्षकांच्या सर्व जागा भरणार आहेत. दरम्यान, आता सुरू असलेल्या बढती, बदलीत बुधवारी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या एकूण ९०० जागा रिक्त राहणार आहेत. पण नव्याने येणारे शिक्षक आणि बदली, बढतीतून या रिक्त जागा भरणार आहेत. यामुळे सोयीची नाही म्हणून शाळा नको म्हटले तर कदाचित संबंधित शिक्षकास अतिरिक्त होण्याचीही वेळ येणार आहे.
जिल्ह्यांतर्गत बदलीतून राज्यातील विविध जिल्ह्यांतून २०५ शिक्षक येणार आहेत. आतापर्यंत सांगली जिल्ह्यातून १५ शिक्षक रुजू झाले आहेत. अजून सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतून शिक्षक येत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यांतून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यास इच्छुक असणाऱ्या ४० शिक्षकांना येथून पदमुक्त करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर १९ जूनला नवनियुक्त ५६३ शिक्षकांना पदस्थापना मिळणार आहे. हे नवीन शिक्षक येणार असल्याने सेवानिवृत्ती, बढती, बदलीने रिक्त होणाऱ्या सर्व जागा भरणार आहेत. परिणामी दुर्गम भागातील प्राथमिक शाळांनाही शिक्षक मिळणार आहेत.
प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर दुर्गम भागातील पालक, शिक्षक मागणीसाठी तालुका, जिल्हा परिषद ते लोकप्रतिनिधींकडे हेलपाटे मारतात. पण यंदा शासनाने नियुक्त केलेले ५६३ शिक्षक एकावेळी मिळणार आहेत. परिणामी रिक्त जागांचा सर्व अनुशेष भरून निघणार आहे. वर्षानुवर्षे शिक्षकांसाठी आस लावून बसलेल्या वाड्या, वस्त्यांतील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनाही गुरुजी मिळणार आहेत. यामुळे आतापासूनच काही शिक्षक सोयीच्या शाळा मिळण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. यातूनच गेल्या दोन दिवसांपासून प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक नेत्यांची वर्दळ वाढली आहे.
- जिल्ह्यातील एकूण शाळा : १९६४
- कार्यरत शिक्षक : ६ हजार
- बदलीसाठी इच्छुक : ३ हजार
- नव्याने रुजू होणारे शिक्षक : ५६३
सर्वाधिक करवीर तालुक्यात
सध्या रिक्त असलेल्या शिक्षकांची तालुकानिहाय संख्या अशी :
करवीर : १०२, चंदगड : ७९, शाहूवाडी : ७६, राधानगरी : ७५, हातकणंगले : ६५, शिरोळ : ६५, भुदरगड : ५४, पन्हाळा : ४९, कागल : ४९, गडहिंग्लज : २६, आजरा : २५, गगनबावडा : ११.