शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 01:39 PM2019-07-03T13:39:25+5:302019-07-03T13:43:19+5:30
कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चेष्टामस्करीतून मित्राला शिवी दिल्याच्या रागातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेदम मारहाण केली. आस्कीन सैफराज मुजावर (वय १५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याचे पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत. बुधवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेत येवून शिक्षक महादेव पंढरीनाथ देवस्थळे (६० रा. यश अपार्टमेंन्ट, मंगळवार पेठ) यांना जाब विचारत धारेवर धरले. त्यांना निलंबित करा, अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतो, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने तणाव पसरला.
कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये चेष्टामस्करीतून मित्राला शिवी दिल्याच्या रागातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेदम मारहाण केली. आस्कीन सैफराज मुजावर (वय १५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याचे पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत. बुधवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेत येवून शिक्षक महादेव पंढरीनाथ देवस्थळे (६० रा. यश अपार्टमेंन्ट, मंगळवार पेठ) यांना जाब विचारत धारेवर धरले. त्यांना निलंबित करा, अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतो, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने तणाव पसरला.
आस्कीन मुजावर हा दहावी ‘ड’च्या वर्गात शिकतो. सोमवारी (दि. १) शाळेचा पहिला दिवस होता. सायंकाळी चारच्या सुमारास आस्कीन आणि त्याचा मित्र अथर्व भोसले खेळत असताना चेष्टामस्करीमध्ये त्याने अथर्वला शिवी दिली. हे शिक्षक महादेव देवस्थळे यांना समजताच त्यांनी आस्कीनला व्हरांड्यातून ओढत आणून पंधरा मिनीटे सर्व मुलांच्या समोर बेदम मारहाण केली. तो ओरडत असतानाही थोडीदेखील दया दाखविली नाही. अमानुषपणे त्याला मारहाण केली. त्यांने घरी गेलेनंतर आई-वडीलांना हा प्रकार सांगितला.
दोन दिवस मुलाला त्रास होवू लागल्याने बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मुलाचे आजोबा इकबाल, वडील सैफराज, आई नूजहत, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल पार्टे, पप्पू शेख, मनिष सासणे, दिपक बोहीत हे शाळेत आले. त्यांनी मुखाध्यापक एम. आर. गोरे यांची भेट घेवून चांगलेच सुनावले. गोरे यांनी पालकांची समजूत घालत संस्थेचे सचिव व्ही. जे. देशपांडे यांचेशी चर्चा करुन शिक्षक देवस्थळे यांचेवर कारवाईचा निर्णय घेतो असे सांगितले.
देवस्थळे हे दोन महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची पत्नी आजारी असल्याने खासगी रुग्णालयात दाखल आहे. मानसिक तणावाखाली त्यांनी विद्यार्थ्यांला मारहाण केली असावी. परंतु त्यांनी केलेली ही मारहाण अमानुष आहे अशी कबुलीही मुखाध्यापक गोरे यांनी दिली. राजवाडा पोलीसांनीही शाळेत भेट देवून माहिती घेतली.
शिक्षकाने मागितली माफी
मुखाध्यापकांच्या कक्षामध्ये शिक्षक देवस्थळे यांना बोलविण्यात आले. ते येताच पालकांनी चांगलेच धारेवर धरले. यावेळी भेंदरलेल्या देवस्थळे यांनी माझी चूक झाली आहे. मला माफ करा, अशी हातजोडून विनवणी केली. चुकीला माफी नाही, यांना शिक्षा झालीच पाहिजे. संस्थेने त्यांचे निलंबन करावे, अन्यथा आम्ही पोलीसांत तक्रार देतो असे सांगत सायंकाळी पाचपर्यंत निर्णय घ्या, असे पालकांनी सांगितले.