मतदार नोंदणीत पदवीधरापेक्षा शिक्षकच वरचढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:54 AM2019-12-20T11:54:37+5:302019-12-20T12:04:34+5:30
शिक्षकच राजकीयदृष्ट्या जास्त सजग असतात हे पुन्हा एकदा प्रत्ययास येत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी गतवेळेपेक्षा दोन हजारांनी जास्त झाली आहे, तर पदवीधरांना गेल्यावेळच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठीही अजून ४० हजार नोंदणीची गरज आहे.
कोल्हापूर : शिक्षकच राजकीयदृष्ट्या जास्त सजग असतात हे पुन्हा एकदा प्रत्ययास येत आहे. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत शिक्षकांची नोंदणी गतवेळेपेक्षा दोन हजारांनी जास्त झाली आहे, तर पदवीधरांना गेल्यावेळच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठीही अजून ४० हजार नोंदणीची गरज आहे.
साधारणपणे एप्रिलमध्ये होणाऱ्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील आमदार निवडण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सातत्याने प्रबोधन करूनही अपेक्षित नोंदणी झालेली नाही. पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न मिळाल्याने पुरवणी यादीचा दुसरा टप्पा सुरूकरण्यात आला आहे. याची मुदत आता या महिनाअखेरला संपत आहे. त्यानंतर जानेवारीत तिसºया टप्प्यातंर्गत निवडणुकीची अधिसूचना निघेपर्यंत ही नोंदणी प्रक्रिया सुरूराहणार आहे.
सातत्याने मुदतवाढ देऊनही नोंदणीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आजच्या घडीला झालेल्या नोंदणीनुसार पदवीधरपेक्षा शिक्षक मतदारसंघासाठी मात्र चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. गतवेळी ९६६२ इतके अंतिम मतदार होते, ती संख्या आता ११ हजार ८४५ वर पोहोचली आहे. गतवेळेपेक्षा ही वाढ २ हजार १८३ ने जास्त दिसत आहे.
शिक्षकांमध्ये उत्साह असला तरी पदवीधरामध्ये मात्र निरुत्साह कायम दिसत आहे. गतवेळी १ लाख २० हजार ८०९ इतकी नोंदणी झाली होती. ती आता कशीबशी ८२ हजार ९६० वर पोहोचली आहे. मागील आठवड्यात हीच संख्या ६९ हजार ८४२ इतकी होती. आठवडाभरात १३ हजार ११८ नी वाढ झाल्याचे दिसत आहे. ही चांगली बाब असली तरी एकूणच पदवीधरांचा निरुत्साह पाहता गतवेळी इतका १ लाख २० हजारांचा आकडा गाठण्यासाठी अजून ४० हजार जणांची नोंदणी करण्याचे आव्हान आहे.
पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघात डझनभर इच्छुक आहेत. त्यांनी नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा लावली आहे, तरीही नोंदणी वाढत नसल्याने त्यांच्याही गोटात सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. ही निवडणूक पसंतीक्रमानुसार होत असल्याने पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची मते घेण्यावर उमेदवारांचे लक्ष असते. मतदारच कमी आणि उमेदवार जास्त असल्यामुळे मतविभागणीची मोठ्या प्रमाणावर झळ बसणार असल्याने पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील आमदारकी लढविणे आता सोपे राहिलेले नाही.