शिक्षकांचे ‘अंबाबाई’ला दंडवत
By admin | Published: January 5, 2017 12:54 AM2017-01-05T00:54:49+5:302017-01-05T01:17:18+5:30
अनोखे आंदोलन : खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने बुधवारी खासगी अनुदानित माध्यमिक व प्राथमिक शाळांतील समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन काढून त्यांच्या समायोजनाचा निर्णय तत्काळ घेण्याची सद्बुद्धी संस्थाचालकांना द्यावी, यासाठी ‘अंबाबाई’ला दंडवत घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
महासंघाच्यावतीने संचमान्यता सन २०१५-१६ नुसार पटसंख्या कमी झाल्याने माध्यमिक व प्राथमिक शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यामुळे शिक्षण विभागाने त्यांची समायोजन प्रक्रिया राबविली. काही शिक्षकांचे समायोजन झाले. मात्र, काही शिक्षण संस्थांनी काही शिक्षकांना हजर करून घेतले नाही. डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले आहे.
याला विरोध व शासनाच्या कारभाराचा निषेध म्हणून अतिरिक्त शिक्षकांनी उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशीही वेतन आदेश निघाले नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार महासंघाच्यावतीने करण्यात आला आहे.
शिवाजी चौकातून दुपारी दीड वाजता महासंघाच्यावतीने दंडवत आंदोलन सुरू केले. एस. व्ही. पाटील, संजय कुंभार, एस. एस. कांबळे, एस. के. बरगे, एन. एस. पाटील, आनंदा डाकरे यांनी दंडवत घातले. याप्रसंगी आंदोलनात राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे, व्ही. जी. पाटील, आनंदा डाकरे, एस. बी. मासाळ, एस. डी. मरळकर, एम. के. पाटील, आर. व्ही. पाटील, विनय शिंदे, मारुती कांबळे, बाळकृष्ण पाटील, संजय कुंभार, एन. आर. शानेदिवाण, के. ए. पाटील, एस. एन. पाटील, आर. जे. चौगुले, एस. आर. थोरात, के. एस. पोवार, व्ही. डी. कांबळे, बी. बी. सुतार, संपत चव्हाण, परशराम चव्हाण, पांडुरंग शिंदे यांचा समावेश होता.
असे होणार आंदोलन
आज, गुरु वारी स्वच्छता अभियान, उद्या, शुक्रवारी शंखध्वनी, शनिवारी (दि. ७) भीक माँगो आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने बुधवारी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन काढून त्यांच्या समायोजनाचा निर्णय तत्काळ घेण्याची सद्बुद्धी संस्थाचालकांना द्यावी, यासाठी ‘अंबाबाई’ला दंडवत घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.