शिक्षकांच्या उत्तरांनी उपस्थितांची मती गुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:03+5:302021-09-08T04:30:03+5:30

कोल्हापूर : एकीकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘वशिल्याने शिक्षकांनी पुरस्कार ...

The teacher's answers dumbed down the audience | शिक्षकांच्या उत्तरांनी उपस्थितांची मती गुंग

शिक्षकांच्या उत्तरांनी उपस्थितांची मती गुंग

googlenewsNext

कोल्हापूर : एकीकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘वशिल्याने शिक्षकांनी पुरस्कार मिळवू नयेत’ असे आवाहन केले असताना दुसरीकडे त्यांच्याच नेतृत्वाखाली कारभार सुरू असलेल्या जिल्हा परिषदेत मात्र ज्यांना साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत, अशा शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने पुरस्कार द्यावेत; मात्र किमान ते मान्यवरांच्या नावे तरी देऊ नयेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेचे पुरस्कार नेहमी चर्चेत असतात. शाहू पुरस्कारापासून ते आदर्श शिक्षक पुरस्कारापर्यंत अनेकवेळा ही बाब अधोरेखित झाली आहे. ३ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक पुरस्कारांसाठी दिवसभर राजर्षी शाहू सभागृहात मुलाखती घेण्यात आल्या. दिवसभर पदाधिकारी आणि प्रमुख अधिकारी या मुलाखतींसाठी उपस्थित होते. परंतु यावेळी शिक्षकांनी दिलेल्या काही उत्तरांनी उपस्थितांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.

यातील काही प्रश्नांची झलक खालीलप्रमाणे...

प्रश्न... महाराणी ताराराणी कोण होत्या?

उत्तर .. त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य केले. त्यांच्या नावे अनेक शिक्षण संस्था आहेत.

प्रश्न.. मती म्हणजे काय?

उत्तर .. मती म्हणजे चारित्र्य.

प्रश्न... मग मतिमंद कोणाला म्हणायचे?

निरुत्तर

प्रश्न .. डॉ. जे. पी. नाईक कोण होते?

निरुत्तर

अशा पद्धतीने काही साधे साधे प्रश्न यावेळी विचारण्यात आले. ज्यांची उत्तरे मुलाखतकर्त्यांना देता आलेली नाहीत. मात्र, यातील काहींना पुरस्कार मात्र देण्यात आला आहे. तालुका, मतदारसंघ, गट, तट, आगामी निवडणुका, शिक्षक संघ, समिती असा सगळा हिशोब घालून, मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, सदस्य या सर्वांच्या शिफारशींचा विचार करून पुरस्कार दिले जातात हे सर्वज्ञात आहे. परंतु केवळ याच जोरावर जर पुरस्कार मिळायला लागला तर, मात्र या पुरस्कारांचे अवमूल्यन झाल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

चौकट

बारा पानी पुस्तक

शिक्षकांनी पुस्तक लिहिले असेल तर त्यासाठी दोन गुण ठेवण्यात आले आहेत. तर एका बहाद्दराने बारा पानी पुस्तक प्रकाशित झाल्याचे यावेळी सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संकलित केलेली माहिती बारा पानांमध्ये बसवून हे पुस्तक लिहिल्याचे दाखवून त्याचेही दोन गुण मिळवण्यात आले.

चौकट

पुरस्कार रद्द करण्याची आरपीआयची मागणी

गैरव्यवहाराची लागण झालेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार रद्द करावेत, अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे सतीश माळगे यांनी केली आहे. गावात न राहणारे, तालुक्याला काम आहे म्हणून फिरणाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात आले आहे, असा आरोप यातून करण्यात आला आहे. तालुक्याला पाहिजे तेवढे गुण देऊन हे पुरस्कार निश्चित केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्याकडे हे निवदेन देण्यात आले आहे. या वेळी किरण माने, कुंडलिक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The teacher's answers dumbed down the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.