शिक्षक बँकेच्या सभेत खडाजंगी

By admin | Published: August 1, 2016 12:42 AM2016-08-01T00:42:50+5:302016-08-01T00:42:50+5:30

पाच तास मॅरेथॉन चर्चा : नफा-तोटा पत्रक चर्चेचे; गगनबावडा, कागल, मुदाळतिट्टा येथे नवीन शाखा

Teachers attend meetings in the bank | शिक्षक बँकेच्या सभेत खडाजंगी

शिक्षक बँकेच्या सभेत खडाजंगी

Next

कोल्हापूर : मासिक वर्गणी, नफा-तोटा पत्रक, विविध ठेवींवरील व्याजाची तरतूद यावरून प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी धारेवर धरले. काही गोंधळाचा अपवादवगळता तब्बल पाच तास मॅरेथॉन सभा चालली. गगनबावडा, कागल, मुदाळतिट्टा येथे नवीन शाखा, मासिक वर्गणी ७०० वरून ५०० करणे असे निर्णय झाले.
बँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आर्यविन मल्टिपर्पज हॉल येथे झाली. अध्यक्षस्थानी राजमोहन पाटील होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन भारते मागील सभेच्या प्रोसेडिंगमधील मासिक वर्गणी वाढीचा ठराव वाचताना त्यावर रवळू पाटील व रवी पाटील यांनी आक्षेप घेतला. वर्गणी वाढीचा ठराव सभेने नामंजूर करूनही सातशे रुपये वसुली कशी करता? ठराव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली; पण ठराव नामंजूर करता येणार नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. या विषयावर बोलण्यास उठलेले ‘पुरोगामी’चे प्रसाद पाटील यांना रोखत सर्वसाधारण सभेचा दिवस सभासदांचा आहे, संचालकांचा नाही, असे साताप्पा चौगले व बशीर पटाईत यांनी सांगितल्यानंतर गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सभा सुरू झाली. मागील प्रोसेडिंगमधील चर्चेवर आक्षेप घेत जितका वेळ प्रोसेडिंग वाचत आहात, तेवढा वेळ गेल्यावर्षी सभा तरी चालली का? असा सवाल कृष्णात कारंडे व राजेंद्र पाटील यांनी केला. त्यामध्ये हस्तक्षेप करत सभासदांची भावना लक्षात घेऊन बहुमताने हा ठराव नामंजूर झाल्याने वर्गणी पाचशे रुपये करण्याची मागणी सतीश बरगे यांनी केली. त्यावर पाचशे रुपये करत असल्याची घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली.
नफा-तोटा पत्रकासह अहवालावर आक्षेप घेत विविध ठेवींवर व्याज आकारणीची तरतूद न करता केवळ १५ लाख नफा दिसत असेल प्रत्यक्षात बँक पावणे दोन कोटींनी तोट्यात असल्याचा आरोप रवी शेंडे, कृष्णात कारंडे यांनी केला.
नाममात्र सभासद पोटनियम दुरुस्ती फेटाळली
आश्रम शाळा, अंगणवाडी सेविका, वर्ग-३ व ४ चे कर्मचाऱ्यांना नाममात्र सभासद करून घेण्याबाबत पोटनियम दुरुस्ती सूचविली होती. पण त्यावर जोरदार हरकत घेत ती फेटाळण्यात आली. उर्वरित पोटनियम दुरुस्ती मंजूर करण्यात आली.
प्रसाद पाटील न्यायालयात जाणार प्रत्येक सभेत आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारे प्रसाद पाटील यांना सत्ताधाऱ्यांनी रोखले. याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सर गणित चुकतेय...
बॅँक तोट्यात असताना लाखो रुपये खर्च करून एवढे चकचकीत अहवाल कशासाठी काढले, असा सवाल करत सर गणित कोठे चुकते ते बघा, असा सल्ला भाट (शिरोळ) यांनी दिला.
मग कोणता अहवाल बोगस?
गेल्या वर्षी खर्च जास्त होऊन ही लेखापरीक्षकांनी ‘अ’ वर्ग दिला. पण यावर्षी खर्च कमी होऊन ‘ब’ वर्ग कसा? कोणत्या वर्षीचा अहवाल बोगस असा सवाल जहीद मुजावर यांनी केला.
राजमोहन यांची मुत्सद्देगिरी
पोलिस यंत्रणेचा दबाव, प्रसारमाध्यमांचे लक्ष यामुळे सभा शांततेत पार पाडणे अध्यक्ष राजमोहन पाटील यांच्यासमोर आव्हान होते. सुरुवातीपासूनच पाटील यांनी सावध भूमिका घेत पाच तास विरोधकांच्या प्रश्नांच्या भडिमाराला त्याच ताकदीने उत्तर देऊन सभा चालविली. त्यांच्या मुत्सद्देगिरीची चर्चा सभास्थळी सुरू होती.
बंदोबस्तामुळे सावध चर्चा
बॅँकेने पाच कॅमेऱ्यांसह पोलिस बंदोबस्त ठेवला होता. पहिल्यांदा गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी तराटणी दिल्यानंतर तेथून पुढे सावधच चर्चा झाली.
सत्तारूढ व्यासपीठावर; विरोधक खाली
सहा वर्षांत पहिल्यांदाच संचालक व्यासपीठावर बसले. पण विरोधी चार संचालक सभासदांमध्ये बसले. अरुण पाटील मात्र सत्ताधाऱ्यांबरोबर व्यासपीठावरच बसले.
‘एटीएम’मध्ये खड्डा!
एटीएममधून पैसे बाहेर येत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांकडे केल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे पैसे खड्ड्यात पडतात, असे म्हटल्याचे एका सभासदाने सांगितले. एकंदरीतच एटीएम कंपनीने प्रचंड त्रास दिला असून, कंपनी बोगस असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

Web Title: Teachers attend meetings in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.