Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:23 PM2019-09-05T14:23:31+5:302019-09-05T14:25:46+5:30

शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.

Teachers became 'IPS': Dr Abhinav Deshmukh | Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख

Teachers Day -शिक्षकांमुळेच ‘आयपीएस’ झालो : डॉ. अभिनव देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्देसहायक आयुक्त ते पोलीस अधीक्षक प्रवास डॉ. अभिनव देशमुख यांच्या आयुष्याला आकार देणारे शिक्षक

एकनाथ पाटील

कोल्हापूर :  शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते.

‘वडील शासकीय नोकरीत असल्याने परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, आदी वेगवेगळ्या शाळांमधून माझे शिक्षण झाले. हुशार असल्याने लातूरच्या केशवराज विद्यालयाचे गुरुजी धोंडीराम नामदेवराव चाफेकर, कै. शंकरराव मोरे, प्रफुल्ल कुलकर्णी, अनिरुद्ध जाधव, डी. वाय. मुळे, अतुल लांडे, विवेक कुलकर्णी, जगन्नाथ दीक्षित, आदी शिक्षकांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांचे वेड मला लावले. त्यामुळे प्रत्येक परीक्षेत मी गुणवत्तेनुसार पहिला येत गेलो. शालेय, महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षांमध्ये शिक्षकांचा प्रभाव माझ्यावर पडल्याने मी एम. बी. बी. एस. पदवीनंतर लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा दिली आणि गुजरात येथील भारतीय सीमा शुल्क विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्त झालो. दोन वर्षे या ठिकाणी नोकरी केली.

वडील महसूल विभागात उपजिल्हाधिकारी होते. गाव पोहनेर (जि. उस्मानाबाद) असले तरी त्यांच्या नोकरीमुळे आम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरत होतो. परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, आदी ठिकाणी माझे शिक्षण झाले. लातूरच्या केशवराज विद्यालयात शिकत असताना धोंडीराम चाफेकर गुरुजी मराठी शिकवीत होते. ते माझे वर्गशिक्षक होते.

पांढरेशुभ्र धोतर, डोक्यावर गांधी टोपी, सोबत नेहमी सायकल असा त्यांचा रुबाबदार पेहराव. त्यांच्याकडे पाहून मला भारतीय कपड्यांमध्ये आपण चांगले दिसू शकतो, याची जाणीव झाली. त्यामुळे लहानपणापासून स्वच्छ कपडे घालण्याची सवय मला लागली. ते धरणे, कारखाने कसे उभे राहिले याची माहिती देण्यासाठी ते स्वत: आम्हाला घेऊन जात असत. त्यांचा प्रभाव माझ्यावर पडला. कै. शंकरराव मोरे हे इतिहास शिकवीत होते. त्यांच्या अंगातच नाट्यकला असल्याने ते शिकवीत असताना इतिहास उभा करीत असत.

राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी-बारावीचे कॉलेज शिक्षण झाले. तेथील शिक्षक अनिरुद्ध जाधव यांचा दरारा मोठा होता. लातूर पॅटर्नचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते समोरून आल्याचे पाहताच आम्ही पाठीमागील जिन्यातून पळून जात होतो.

ते अगदी शिस्तबद्ध व कडक स्वभावाचे होते. त्यांना बाहेरून खासगी क्लासेस, शिक्षण संस्थांच्या आॅफर येत होत्या; परंतु त्यांनी पैसा कमाविण्याऐवजी संस्थेशी एकनिष्ठ राहून ती नावारूपास आणली. संस्थेतील एकाही शिक्षकाला स्वत:चा वैयक्तिक क्लास घेऊ दिला नाही. त्यांच्याकडून मी शिस्तीचे धडे शिकलो. औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. एम. बी. बी. एस. ही पदवी घेतली. येथील शिक्षक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्याकडून पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील घडामोडींच्या ज्ञानाचा खजिना आत्मसात करता आला. डॉ. डी. वाय. मुळे यांनी आजारी असताना खूप चांगले शिकविले.

शालेय जीवनातच दक्षिण भारताची सहल केली. अनेक ठिकाणी भेटी दिल्याने खूप मोठा अनुभव घेता आला. कवी कुसुमाग्रज यांना भेटायची संधी मिळाली. प्रफुल्ल कुलकर्णी हे तसे राजकीय शिक्षक. ते शाळेत कमी आणि बाहेर जास्त असत. त्यामुळे आम्ही त्यांना ‘राजकीय शिक्षक’ या नावाने ओळखत होतो. ते मराठी शिकवीत होते. त्यांनी शिकविलेली कोलंबस गर्वगीत कविता आयुष्यात कधीच विसरलो नाही. कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतून त्यांनी आम्हाला जीवन शिकविले. शिक्षकांमुळेच मी ‘आयपीएस’ झालो.

रेक्टरला ठेवले कोंडून

औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना शासकीय वसतिगृहामध्ये आम्ही राहत होतो. पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी याठिकाणी अनेक महिने राहत असल्याने रोज दंगामस्ती असायची. रात्रीच्या वेळी वीज बंद करून गोंधळ घालायचा. अशावेळी येथील रेक्टर नंदरुकर सर हे आम्हाला ओरडायचे. एके दिवशी आम्ही त्यांना अंधारात कोंडून घातले; परंतु ते आम्हाला काही बोलले नाहीत. त्यांचा स्वभाव मजेशीर होता.

शिक्षणाची शिदोरी सार्थ ठरली

वडील महसूल विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांच्यासोबत विविध शासकीय कार्यालयांत जात होतो. त्यांच्यासोबत फिरताना त्यांचे वरिष्ठ बॉस कोण? याची मला उत्सुकता लागून राहत होती. मोठे झाल्यावर आपणही असेच अधिकारी बनायचे, अशी जिद्द मनात ठेवली होती. लहानपणापासून शिक्षकांनी दिलेली शिक्षणाची शिदोरी ही मला अधिकारी बनण्यासाठी सार्थ ठरली.
 

 

Web Title: Teachers became 'IPS': Dr Abhinav Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.