शिक्षक राजकारणात गुंतले अन् विद्यार्थी परीक्षेला मुकले, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेत घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:43 PM2022-12-22T12:43:26+5:302022-12-22T12:44:21+5:30
विक्रम पाटील करंजफेण : घुंगूर (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन ...
विक्रम पाटील
करंजफेण : घुंगूर (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन . एम. एम. एस. परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले. मात्र त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली ( ता.पन्हाळा ) येथे असल्याने त्यांना या केंद्रात परीक्षा देता आली नाही. त्यामुळे १८ विद्यार्थ्यांचे वर्षेभराचे कष्ट वाया जाऊन सारथीची शिष्यवृत्ती हातून गेली.
घुंगूर हायस्कूलमधील एका कर्मचार्यांची पत्नी थेट सरपंचपदाच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे येथील मुख्याध्यापकासह अन्य शिक्षक कर्मचारी प्रचारात गुंतले असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रिका देखील पहायला त्यांना वेळ नसल्याचे सांगत पालकांनी याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून संबंधितावर वरिष्ठ अधिकार्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
बांबवडे येथील केंद्रावर बांबवडे, सोनुलें, पिशवी, शित्तुरतर्फे मलकापूर या केंद्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. घुंगुरच्या विद्यालयाने सोईनुसार कोतोली केंद्राची निवड केली होती. पंधरा दिवसांपूर्वी प्रवेशपत्रिका ऑनलाईन आल्याचे केंद्र संचालकांनी संबंधित मुख्याध्यापकांना देखील कळविले होते. परीक्षेची १० वाजून २० मिनिटाची वेळ असताना आज मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षक १८ परीक्षार्थींना बांबवडे परीक्षा केंद्रावर १० वाजून २५ मिनिटांनी घेऊन आले. त्यांना कोतोली केंद्रावर जायचे होते मात्र तेथे न जाता चुकीच्या केंद्रावर पाच मिनिटे उशिरा घेऊन आले होते. १५ दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रवेशपत्र दिले असतानाही मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी व विद्यार्थी यापैकी कोणीच न पाहिल्याने हा गोंधळ झाला.
केंद्रावर अतिरिक्त पेपर दिलेले असतात, पण नियम, अटी पूर्ण केल्याशिवाय त्या पेपरचे सील काढता येत नाही. विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने त्यांना अतिरिक्त पेपर देता येत नाही. शिक्षकांनी काळजीपूर्वकप्रवेशपत्रिका न पाहिल्याने हा प्रकार घडला असल्याचे पं.स.शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी सांगितले.
घुंगूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता वर्गशिक्षकांना सदर विभागाचे काम सोपवले होते. दिवसभरात त्यांच्याशी संपर्क झाला नाही. शिक्षकांशी संपर्क करून विद्यार्थी, पालकांशी चर्चा करतो असे सांगण्यात आले.