‘जुन्या पेन्शन’साठी शिक्षक, शासकीय कर्मचारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 05:07 PM2019-09-09T17:07:59+5:302019-09-09T17:10:42+5:30
जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन केले. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक अशा एकूण ३७५० शाळा बंद ठेवल्या. जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी या धरणे आणि संपामध्ये सहभागी झाले.
राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समिती आणि राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात विविध संघटना सहभागी झाल्या. आंदोलनकर्ते दुपारी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. रिमझिम पावसातही ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’, ‘सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर झाल्याच पाहिजेत’, अशा मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनस्थळी सभा घेण्यात आली.
यावेळी जुनी पेन्शन हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार, खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, शिक्षक नेते दादा लाड, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, संभाजी बापट, अर्जुन पाटील, शीलाताई कांबळे, सविता गिरी, मारुती लांबोरे, रवि पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने दुपारी प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना मागण्यांचे निवेदन दिले.