आमदारकीसाठी शिक्षकांची मोर्चेबांधणी शिक्षक आमदार
By Admin | Published: May 24, 2014 12:53 AM2014-05-24T00:53:57+5:302014-05-24T01:00:40+5:30
मतदारसंघ निवडणूक : सातजण रिंगणात; गाठीभेटी सुरू
कोल्हापूर : शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ), शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, मौनी विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सात जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. महिनाभर आधीच संबंधित निवडणूक जाहीर झाल्यामुळे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या इच्छुकांनी मतदार आणि पाठिंबा मिळविण्यासाठी शैक्षणिक संस्था, संघटनांच्या पदाधिकार्यांच्या वैयक्तिक भेटीगाठींचा वेग वाढविला आहे. या निवडणुकीसाठी विद्यमान शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार या मतदारसंघातून दुसर्यांदा प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची राज्यातील ताकदवार संघटना समजल्या जाणार्या ‘टीडीएफ’कडून चार जणांनी नावे जाहीर केली आहेत. त्यात सातार्यातील दशरथ सगरे, बारामतीमधील गणपत तावरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व पंढरपूरचे सुभाष माने आणि कराडचे डॉ. मोहन राजमाने. यातील तावरे हे गजेंद्र ऐनापुरे यांच्या गटाकडून, तर जयवंत ठाकरे यांच्या गटाद्वारे व रयत शिक्षण संस्था पुरस्कृत उमेदवार म्हणून डॉ. राजमाने यांचे नाव गेल्या दीड महिन्यांपूर्वी ठाकरे आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी कोल्हापूरमधून जाहीर केले आहे. शिक्षक परिषदेकडून दत्ता सावंत हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. मौनी विद्यापीठाकडून शिवाजी खांडेकर आणि प्रा. प्रताप देसाई यांच्या नावांची चर्चा आहे. पदवीधर आमदार निवडणुकीप्रमाणे ‘शिक्षक’साठीच्या उमेदवारीबाबत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अजूनही शांतताच दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून येत्या दोन-तीन दिवसांत उमेदवार जाहीर होण्याची शकयता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)