शिक्षकांचे पवित्र पोर्टल बदलणार : आमदार आसगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 09:21 PM2020-12-12T21:21:18+5:302020-12-12T21:23:14+5:30
Teacher, Kolhapurnews, Mla, Education Sector, Pavitra Portal शिक्षकांच्या भरतीसाठी तयार केलेले पवित्र पोर्टल बंद होणार नाही; फक्त त्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, त्याचे नावही बदलले जाणार आहे, अशी माहिती नूतन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
कोल्हापूर : शिक्षकांच्या भरतीसाठी तयार केलेले पवित्र पोर्टल बंद होणार नाही; फक्त त्यात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, त्याचे नावही बदलले जाणार आहे, अशी माहिती नूतन शिक्षकआमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
शनिवारी आसगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
ते म्हणाले, आमदार झाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी झालेल्या पहिल्याच बैठकीत शिक्षकभरतीला मान्यता मिळाली, याचा आनंद आहे. ही भरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे. ते बंद केले जाणार नाही; पण यात ज्या अडचणी आहेत, त्या सोडविण्याला प्राधान्य राहणार आहे. शिवाय या पोर्टलचे नावदेखील बदलण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच त्याचे परिणाम दिसतील.
वाढलेल्या मतदानाचा फायदा आपल्याला झाल्याचे आसगावकर यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून लढल्याचाही मोठा लाभ झाला. त्यातही शरद पवार यांचे सूक्ष्म नियोजन विजयापर्यंत घेऊन गेले. त्यांनी मनावर घेतल्यानेच रयत, स्वामी विवेकानंद, पुणे जिल्हा शिक्षक मंडळ अशा मोठ्या संस्थांचे पाठबळ मिळाले. या संस्थांमुळे विजय सुकर झाल्याची कबुलीही त्यांनी दिली. यावेळी प्रा. एस. पी. चौगले उपस्थित होते.