शिक्षकांचे समायोजन सप्टेंबर २०१४ नुसार करा
By admin | Published: November 17, 2014 12:18 AM2014-11-17T00:18:52+5:302014-11-17T00:23:39+5:30
शिक्षक संघटना : पडताळणी करून निर्देश देण्याची शिक्षक संचालकांची ग्वाही
कोल्हापूर : राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन २०१३ पासून रखडले आहे. सप्टेंबर २०१४ च्या शिक्षक निश्चितीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांची भेट घेऊन केली.
मागणीसंबंधी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच प्रशासकीय बाबींची पडताळणी करून योग्य ते निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल, असे आश्वासन श्री. माने यांनी शिष्टमंडळाला दिल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
पत्रकात म्हटले आहे, दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विद्यार्थी संख्येच्याआधारे शिक्षक संचनिश्चिती करून आॅक्टोबरअखेर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, बदल्या करण्याबाबतचे शासननिर्देश आहेत पण सन २०१३ मध्ये प्रथमच शिक्षणाचा हक्क कायद्याच्या निकषांनुसार शिक्षक निश्चिती झाल्यामुळे समायोजन प्रक्रियेस विलंब झाला आहे. दरम्यान, आचारसंहिता व न्यायालयीन स्थगिती आदी कारणांमुळे सप्टेंबर २०१३ चे शिक्षक समायोजन काही जिल्ह्णांत अद्याप झालेले नाही. त्यामुळे संघटनेचे राज्याध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने पुणे येथे श्री. माने यांची भेट घेऊन चर्चा केली.
सप्टेंबर २०१३ चा विद्यार्थीपट व सप्टेंबर २०१४ चा विद्यार्थीपट भिन्न आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१३ च्या शिक्षक शिक्षक निश्चितीवर २०१४ रोजी अतिरिक्त शिक्षकांच्या समाजयोजन बदल्या केल्यास आज रोजी नको असलेल्या ठिकाणी शिक्षक दिला जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी शिक्षक मिळणार नाही. समायोजनेस पात्र असलेले शिक्षक अद्याप जुन्याच शाळेत आहेत. त्यामुळे सप्टेंबर २०१४ च्या पटानुसार करण्यात येणारी शिक्षक संचनिश्चिती मागील वर्षी समायोजन होऊ न शकलेल्या शिक्षकांसह करणे सोईस्कर होईल,अशी श्री. माने यांच्याशी चर्चा झाली. शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पाटील, सतीश बजाईत, विजय भोगेकर,भागवत पाटील, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते.