शिक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलन करावे
By admin | Published: April 25, 2016 12:37 AM2016-04-25T00:37:46+5:302016-04-25T00:52:34+5:30
मुक्ता दाभोलकर : आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण; पानसरे-दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्युत्तर देण्याची शिक्षकांत ताकद
कोल्हापूर : विद्यार्थी ज्या मानसिकतेतून शाळेत येतो, ते पाहता त्याला केवळ पुस्तकीज्ञान देऊन उपयोगी नाही. अभ्यासक्रमात अनेक जागा दडलेल्या आहेत, त्याचा शोध घेऊन शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले तर समाज परिवर्तनास वेळ लागणार नाही, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. पानसरे-दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद शिक्षकांच्या भूमिकेत असल्याने या विचाराचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी त्यांनी राहावे, असेही त्यांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने रविवारी आयोजित सावित्रीबाई फुले व महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी समितीच्या राज्य महिला आघाडी प्रमुख सुरेखा कदम होत्या.
मूर्तिदान चळवळ कोल्हापुरातून उभी राहिली, ती राज्यभर नेण्याचे काम ‘अंनिस’ने केले असून, आता या विषयात लोकांमध्ये कमालीची जागृती झाल्याचे सांगत दाभोलकर म्हणाल्या, जगात सर्वांत प्रगत शिक्षण फिनलॅँडमध्ये मिळते, कारण तेथील सरकार प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व समानतेवर अधिक लक्ष देते. आपल्याकडे गुणवत्ता राखली जाते; पण त्यामध्ये समानता नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडल्या आहेत. जीवन विविधतेने भरलेले आहे, अंधश्रद्धा प्रत्येकाच्या वाट्याला येतात, ते पुस्तकात कोठेही प्रतिबिंबीत होणार नाही; पण शिक्षकांनी त्याचा शोध घेऊन त्याचे निर्मूलन करावे. अंधश्रद्धाबाबत वर्गात प्रयोग करा, त्याबद्दल लिहा, त्याला प्रसिद्ध देण्याचे काम ‘अंनिस’ करेल. जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असणारे शिक्षण आपण देतो का? शिक्षण हे वैयक्तिक उन्नतीचे साधन असले तरी केवळ आपल्या हक्कासाठी लढा न देता समाजातील जुनाट परंपरेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करावे. विद्यार्थ्यांशी संवाद साधा, चाकोरीबाहेर जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षक समिती शिक्षकांसह पालक व समाजातील प्रश्न घेऊन लढत असून, हा वसा व वारसा शिक्षकांनी जोपासावा, असे आवाहन सुरेखा कदम यांनी केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगले, दीपाली भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले.
सरचिटणीस राजेश सोनपराते यांनी स्वागत, तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे, उदय शिंदे, चंद्रकांत आणावकर, सुरेश कोळी, विष्णू जाधव, सुधाकर सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)