विद्यार्थ्याचा जीव वाचविण्यासाठी शिक्षकाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:20 AM2021-05-30T04:20:38+5:302021-05-30T04:20:38+5:30

सोशल मीडियाचा प्रभावी वापर लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षे वयाच्या परळी पैकी मांडवकरवाडी (ता. शाहूवाडी) ...

The teacher's struggle to save the student's life | विद्यार्थ्याचा जीव वाचविण्यासाठी शिक्षकाची धडपड

विद्यार्थ्याचा जीव वाचविण्यासाठी शिक्षकाची धडपड

googlenewsNext

सोशल मीडियाचा प्रभावी वापर

लोकमत न्यूज नेटवर्क

करंजफेण :

दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षे वयाच्या परळी पैकी मांडवकरवाडी (ता. शाहूवाडी) येथील आर्यन नारायण लांवगरे याला लहान वयात मेंदूविकार झाल्याने त्याला वाचविण्यासाठी शिक्षकांची जिवाची धडपड अख्ख्या शाहूवाडी तालुक्याने अनुभवली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दानशूरांनी गुरुजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माणुसकीचा ओलावा अजूनदेखील जिवंत असल्याचे दाखवून दिले. या मदतनिधीतून संकलित झालेल्या दीड लाख रुपयांच्या मदतीने गरीब शिष्याचा जीव वाचणार असल्याच्या जाणिवेतून आठवडाभरापासून धावपळ करणाऱ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंदछटा उमटल्या.

मांडवकरवाडी येथील जि.प.प्राथमिक शाळेत दुसरीत शिकणारा आर्यन याला मेंदूच्या विकाराचा अचानक त्रास जाणवू लागला. १७ मे रोजी त्याला अत्यवस्थ स्थितीत कोल्हापूर येथील बालरोगतज्ज्ञांकडे दाखल केले. येथे एमआरआय स्कॅन चाचणीत त्याच्या मेंदूजवळ गाठ (एंडोस्कोपिक ट्युमर) असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च सांगितला. आर्यनचे वडील हाॅटेलमध्ये वेटरचे काम करतात. त्यामुळे हा खर्च तसा त्यांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने ते हतबल झाले.

दरम्यान, आर्यनची जीवन-मृत्यूशी सुरू असलेली झुंज मांडवकरवाडी शाळेचे शिक्षक अशोक धोंडीराम पाटील यांच्या कानावर आली. आर्यनच्या घरची गरिबी त्यांना ज्ञात असल्याने त्यांनी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल, या जाणिवेतून त्यांनी सहकारी शिक्षक सुभाष गांगुर्डे, अशोक माने यांना साथीला घेत आर्यनच्या शस्त्रक्रियेसाठी निधी संकलनाचा निर्णय घेतला. सोशल मीडियाद्वारे आर्यनची वस्तुस्थिती (चाचण्यांचे तपशील) समाजासमोर मांडून त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळत आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आणि १ लाख ५५ हजार ३८६ रुपये मदत संकलित झाली. दुर्गम भागातील एका गरीब कुटुंबासाठी कोरोनासाथ, लॉकडाऊनच्या काळात एवढी मोठी रक्कम जमा करणे केवळ अशक्यप्राय गोष्ट, परंतु समाजात अद्यापही माणुसकी जिवंत आहे, याचाच प्रत्यय दात्यांनी दाखवून दिला आहे. अद्यापही हा मदतीचा ओघ सुरूच आहे.

फोटो : सोशल मीडियाव्दारे जमा केलेली दीड लाखाची मदत आर्यनचे वडील नारायण लांवगरे यांच्याकडे कोल्हापूर येथे सुपूर्त केली.

चौकट

आर्यन उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून जीवघेण्या आजारावर मात करून लवकरच घरी येईल.समाजातील सर्वच घटकांनी केलेले मदतीचे सहकार्य बहुमोल असल्याची भावनिक प्रतिक्रिया शिक्षक अशोक धो.पाटील आणि नारायण लांवगरे यांनी व्यक्त केली.

Web Title: The teacher's struggle to save the student's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.