विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षकांचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:38 AM2019-06-22T00:38:57+5:302019-06-22T00:39:03+5:30
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सर्वाधिक विद्यार्थी ...
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आणत कोल्हापूर जिल्ह्याने आपला या क्षेत्रातील दबदबा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शिक्षकांनी जे परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आकार दिला, त्या सर्वांचेच हे यश आहे, असे म्हटले पाहिजे.
कोल्हापूर जिल्ह्याने आशियासह आफ्रिका खंडाच्या प्राथमिक शिक्षणाला दिशा देण्याची कामगिरी केली, पद्मविभूषण डॉ. जे. पी. नाईक यांच्या या जिल्ह्याने मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. गेली काही वर्षे शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये कोल्हापूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. झोकून देणाऱ्या शिक्षकांची जिल्ह्यात कमतरता नाही. अगदी रविवारची सुट्टी न घेताही काम करणारे अनेक शिक्षक आणि शिक्षिका आहेत. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीतही अध्यापनाचे काम करणारे शिक्षक आहेत. या शिक्षकांना नोकरीच्या ठिकाणी ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेतील हे दरवर्षी मिळणारे राज्यव्यापी यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेकांनी आपले घरदार सोडून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेतला असल्याने ते शक्य झाले आहे. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळणार किंवा नाही याचा विचार न करता हे काम करणारी अनेक मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. म्हणूनच हे यश पाहायला मिळत आहे.
शिक्षकांच्या पाठीशी राहणे गरजेचे
जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढील काळात शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली पाहिजे.
काही शिक्षक हे जरी नेतेगिरी करीत असले, चुकारपणा करीत असले, बेकायदेशीर कामांमध्ये अडकले असले तरी त्याच दृष्टीने अन्य शिक्षकांकडे पाहून उपयोग नाही.
शिक्षकांच्या बदल्या म्हणजे ‘मिळकतीची आयती संधी’ असे पाहू नये. त्यांना पुरस्कारासाठी जोडणी करावी लागू नये एवढी जरी दक्षता घेतली तरी खूप काही केल्यासारखे होईल.
कोल्हापूर शहर आणि
जिल्ह्याचा एकूण निकाल (शिष्यवृत्तीधारक)
अ. न. तालुका पाचवी आठवी एकूण
१ भुदरगड ८५ ७१ १५६
२ राधानगरी ६९ ८१ १५०
३ कागल ७९ ४४ १२३
४ गडहिंग्लज ४६ ४० ८६
५ करवीर ३६ ४५ ८१
६ आजरा ३५ ४३ ७८
७ चंदगड २७ ३६ ६३
८ शिरोळ २८ २७ ५५
९ हातकणगंले १९ २६ ४५
१० पन्हाळा ५ २८ ३३
११ शाहूवाडी ७ १४ २१
१२ गगनबावडा २ ४ ६
एकूण ४३८ ४५९ ८९७
कोल्हापूर म.न.पा १०३ ६७ १७०
इचलकरंजी न. पा ५० ५५ १०५
एकूण १५३ १२२ २७५
एकू ण ५९१ ५८१ ११७२