‘विवेकानंद’तर्फे शिक्षक आपल्या दारी.... अभिनव उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:25 AM2019-01-24T01:25:33+5:302019-01-24T01:27:22+5:30
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा
प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्गातील अनुपस्थिती वाढत चालली आहे. ती कमी करून शिक्षणापासून दूर होत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने ‘शिक्षक आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
महाविद्यालयात अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागांतील आहेत. विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी, शेतमजूर किंवा नोकरदार आहेत. त्यांना महाविद्यालयात येऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शक्य होत नाही. अशा पालकांना त्यांच्या पाल्यांची शैक्षणिक प्रगती कळावी, त्यांच्या अडचणींची उकल व्हावी, महाविद्यालयाच्या विविध पाठ्यक्रमांची माहिती व्हावी, म्हणून हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची आवड, कल, त्यांची शैक्षणिक प्रगती यांसह त्यांच्या वर्गातील उपस्थितीची माहिती पालकांना घरबसल्या मिळत असल्याने या उपक्रमाबाबत पालकवर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे शिक्षक व पालक यांच्यातील हरवत चाललेला संवाद या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ होत आहे. त्यासोबतच शिक्षक व विद्यार्थ्यांतील जिव्हाळा वाढण्यास मदत होत आहे, असे डॉ. दीपक तुपे यांनी सांगितले.
प्राध्यापकांचे गट
‘शिक्षक आपल्या दारी’ या उपक्रमात पाच ते सहा प्राध्यापकांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. ३१ गावांमध्ये हे गट कार्यरत आहेत. या उपक्रमांतर्गत शिक्षक रोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत महाविद्यालयातील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसोबत संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा, करिअर दिशा निश्चित केली जाणार आहे. यासह त्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
आज शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालक जर महाविद्यालयात येत नसतील तर प्राध्यापकांनी पालकांच्या दारात जाऊन त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयीची माहिती देणे हा या उपक्रमांचा हेतू आहे.
-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर