रेंदाळमध्ये विद्यार्थ्याच्या आंदोलनानंतर शिक्षकाची बदली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:52 AM2020-12-11T04:52:44+5:302020-12-11T04:52:44+5:30
कोल्हापूरमधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेचे रेंदाळ येथे विद्यालय आहे. या विद्यालयात विक्रम कोरवी हे गेल्या सात-आठ वर्षांपासून शिकवत आहेत. ...
कोल्हापूरमधील एका नामांकित शैक्षणिक संस्थेचे रेंदाळ येथे विद्यालय आहे. या विद्यालयात विक्रम कोरवी हे गेल्या सात-आठ वर्षांपासून शिकवत आहेत. दहावीचे वर्गशिक्षक व विज्ञान विषय शिकवतात. त्यांची विषय समजावून सांगण्याची खास हातोटी विद्यार्थ्यांमध्ये प्रिय आहे. संस्था प्रशासनाने प्रशासकीय कामकाज पद्धतीनुसार त्यांच्या बदलीचा आदेश दिला होता. त्यामुळे कोरवी हे बदलीच्या ठिकाणी रवाना होण्यासाठी तयारी करू लागले. ही बाब विद्यार्थी, पालकांना समजताच त्यांनी कोरवी यांना शाळा सोडून न जाण्याची विनंती केली. मात्र, नाइलाज असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले; त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून धरणे आंदोलन करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे मुख्याध्यापकांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणली. संस्था सचिवांनी शिक्षक कोरवी यांची बदली रद्द केल्याचे यावेळी पालकांना दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर धरणे आंदोलन मागे घेत आनंदोत्सव साजरा केला.