रजेच्या कालावधीत शिक्षक मिळणार

By Admin | Published: September 11, 2014 11:23 PM2014-09-11T23:23:51+5:302014-09-11T23:38:18+5:30

महावीर माने : शिक्षक समिती संघटनेला आश्वासन

Teachers will be available during the leave period | रजेच्या कालावधीत शिक्षक मिळणार

रजेच्या कालावधीत शिक्षक मिळणार

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दीर्घमुदत रजेवर असणाऱ्या शिक्षकांच्या रजा कालावधीत शिक्षक देण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात १० टक्के शिक्षकांची रजा राखीव शिक्षक म्हणून जादा नियुक्ती करण्याचे आदेश लवकरच निर्गमित होतील, असे आश्वासन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने व शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
पुणे येथे झालेल्या गुणवत्ता विकासबाबत आयोजित संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत माने व चोक्कलिंगम यांनी आश्वासन दिल्याची माहिती महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात असे म्हटले आहे की, माध्यमिक शाळांप्रमाणे दीर्घमुदत रजा, प्रसूती रजा व गंभीर आजारी, आदी दीर्घमुदत रजेवर जाणाऱ्या शिक्षकांच्या जागी रजा कालावधीत शिक्षक देण्याची तरतूद स्थानिक संस्थांच्या प्राथमिक शाळांकडे नसल्याने या शाळातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत होता. त्यामुळे रजेच्या कालावधीत शिक्षक देण्यात यावा यासाठी रजा राखीव शिक्षक नियुक्त होणे आवश्यक असल्याची मागणी संघटनेने शासनाकडे केली होती.
त्यावर माने आणि चोक्कलिंगम यांनी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येक तालुक्यात अवश्य शिक्षक संख्येपेक्षा १० टक्के जादा शिक्षकांची रजा राखीव शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल. त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसाइतका पगार दिला जाणार आहे आणि भविष्यात सेवानिवृत्ती व पदोन्नतीने रिक्त होणाऱ्या अध्यापक पदावर या रजा राखीव शिक्षकांनाच गुणानुक्रमे नियमित शिक्षक म्हणून सामावून घेतले जाणार आहे.
यावेळी राज्याचे शिक्षण सहसंचालक गोविंद नांदेडे, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष अर्जुन साळवे, समन्वयक एस. डी. पाटील, शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, उपनेते मोहन भोसले, मागासवर्गीय संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिक्षकांची प्रशिक्षणे यापुढे आॅनलाईन
बैठकीत शासनाने गुणवत्ता विकासाबाबत २००७ मध्ये काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे ठरले. शिक्षकांचे कागद काम कमी व्हावे यासाठी सर्व माहिती यापुढे आॅनलाईन भरण्यात येईल. शिक्षकांची प्रशिक्षणे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा घेण्यात येतील, असे सांगण्यात आले.

Web Title: Teachers will be available during the leave period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.