तालीम, मंडळांनी सामाजिक सलोखा राखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 12:36 AM2017-08-07T00:36:43+5:302017-08-07T00:36:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहरातील तालीम, मंडळांनी सामूहिक संस्कृती वाढीला बळ द्यावे. सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले.
येथील श्री खंडोबा तालीम मंडळाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, अॅड. धनंजय पठाडे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, तालीम, मंडळांनी त्यांच्या इमारती अद्ययावत कराव्यात. उपनगरातील कॉलन्यांनी आपल्या परिसरात मंदिराची उभारणी अथवा खुल्या जागेत उद्याने विकसित करावीत. विद्यार्थी, तरुणाई, वृद्ध यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. त्यातून सामाजिक सामूहिक संस्कृती वाढवावी. शिवकालीन मर्दानी खेळ टिकविण्याचे महत्त्वपूर्ण काम खंडोबा तालीम करीत आहे. या खेळांच्या प्रसारासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल.
खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरच्या तालीम संस्था परंपरेत खंडोबा तालीम मंडळाचे नाव आवर्जून घ्यावे लागते. या तालमीची नूतन वास्तू शिवाजी पेठेला साजेशी झाली आहे. आमदार नरके म्हणाले, नवीन क्रीडा धोरणाच्या राज्यस्तरीय समितीत माझा समावेश आहे. कोल्हापूरमधील विविध क्रीडा संघटनांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठीचे पर्याय या धोरणामध्ये समाविष्ट करण्याचा माझा प्रयत्न राहील.
या कार्यक्रमात नूतन वास्तूचे बांधकाम करणारे लक्ष्मण पोवार, संजय इंगळे यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पालकमंत्री म्हणाले,
आठ खेळाडू यावेळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील इतके टॅलेंट कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
हे टॅलेंट पाहता क्रीडा विकासाला बळकट करण्यासाठी तालीम, मंडळांनी कार्यरत राहावे.
समाजाला आनंद देणारे उपक्रम राबविण्यासाठी शासन हॅप्पीनेस मंत्रालय साकारणार आहे.
लोकसहभाग, वर्गणीतून खंडोबा तालीम मंडळाने देखणी, सुसज्ज इमारत साकारली आहे. या मंडळाच्या अन्य उपक्रमांना निधी उपलब्ध करून दिला जाईल.