Ganpati Festival-पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाचा कोल्हापुरातील टीम गणेशाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 03:44 PM2020-08-24T15:44:33+5:302020-08-24T15:47:35+5:30
कोरोनाच्या संकटात दक्षता म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना कोल्हापुरातील टीम गणेशाचे (कोल्हापूर गणेशोत्सव २०२०) समन्यवक प्रशांत मंडलिक यांनी मांडली आहे. अमोनियम बायकार्बेनेट (बेकरी उत्पादनामध्ये वापरला जाणारा खायचा सोडा) वापरून प्लास्टर ऑफ पँरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत त्याच्याकडून प्रबोधनाचा जागर सुरू आहे. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात दक्षता म्हणून आपल्या लाडक्या बाप्पांचे घरच्या घरीच विसर्जन करण्याची संकल्पना कोल्हापुरातील टीम गणेशाचे (कोल्हापूरगणेशोत्सव २०२०) समन्यवक प्रशांत मंडलिक यांनी मांडली आहे. अमोनियम बायकार्बेनेट (बेकरी उत्पादनामध्ये वापरला जाणारा खायचा सोडा) वापरून प्लास्टर ऑफ पँरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत त्याच्याकडून प्रबोधनाचा जागर सुरू आहे. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या काळात गणेशमूर्ती विसर्जनासाठी काय करता येईल याचा विचार स्टेशनरी मार्केटिंगचे काम करणाऱ्या आणि पर्यावरण, सामाजिक, आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रशांत यांच्या डोक्यात लॉकडाऊनच्या काळात सातत्याने सुरू होता. त्यांनी सोशल मिडिया, इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेणे सुरू केले. त्यावेळी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ. मोहन डोंगरे आणि डॉ. शुभांगी उंबरकर यांनी खायचा सोडा वापरून मूर्ती विरघळविण्याचा प्रयोग सन २०१५ मध्ये यशस्वी केल्याची माहिती त्यांना मिळाली.
या संशोधनाच्या शोधनिबंधातून मिळालेली माहिती प्रशांत यांनी त्याचे मित्र प्रमोद पुंगावकर यांना सांगितली. पुढे या दोघांनी पीओपीपासून बनविलेल्या मूर्तीचे खायचा सोडा वापरून विसर्जन करण्याचा प्रयोग करून पाहिला. त्याला यश मिळाल्याने त्यांनी याबाबत टीम गणेशाच्या माध्यमातून कोल्हापुरातील नागरिकांचे प्रबोधन करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी या पर्यावरणपूरक प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ करून तो सोशल मिडियाच्या विविध प्लँटफॉर्मवर प्रसारित केला आहे. त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनमधील वेळेत प्रशांत यांच्या विचारातून पुढे आलेली ही संकल्पना कोल्हापूरच्या पर्यावरण चळवळीला बळ देणारी आहे.
असे करता येईल पर्यावरणपूरक विसर्जन
गणेशमूर्तीचे असे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणात ठेवून त्यावर अखंडपणे या द्रावणाचा अभिषेक सोडल्यानंतर मूर्ती ७२ ते १२० तासांत विरघळते. त्यापासून प्लास्टर ऑफ पॅरिस, गवत, रंग व अन्य घटक सुटे होतात. अशा रीतीने प्रत्येक नागरिक घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करू शकतो.
मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये, तर पीओपीचे कँल्शियम कार्बानेटमध्ये रूपांतर होते. यातील पाणी हे झाडांना खत म्हणून आणि प्लास्टर हे रस्ते बांधणीसाठी वापरता येते, असे मंडलिक यांनी सांगितले.
पीओपीची मूर्ती नदी, विहिरीत विसर्जित केल्यास पाण्याचे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी काही पर्याय देता येईल का याचा विचार मनात आला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेत त्यादृष्टीने माहिती संकलित केली. डॉ. डोंगरे आणि डॉ. उंबरकर यांच्या संशोधनाची आणि अशा पध्दतीने पुणे, नागपूर, राहुरी येथे पर्यावरणपूरक विसर्जन केल्याची माहिती मिळाली. मग, कोल्हापुरात ही संकल्पना मांडण्याचा निर्णय घेतला. प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्याने या पर्यावरणपूरक विसर्जनाचा व्हिडिओ हा सोशल मिडियावरून प्रसारित केला. आतापर्यंत कोल्हापूरसह राज्यातील सुमारे बाराशे जणांनी आमच्या संकल्पनेची माहिती घेतली आहे. मूर्तीकारांनीही त्यांच्या स्टॉल या संकल्पनेचे फलक लावले होते. लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग करता आल्याचे समाधान आहे.
-प्रशांत मंडलिक