इचलकरंजीच्या काळम्मावाडी नळ योजनेस लवकरच तांत्रिक मंजुरी
By Admin | Published: February 6, 2015 12:27 AM2015-02-06T00:27:13+5:302015-02-06T00:42:12+5:30
स्वच्छ पाणीपुरवठा होणार : ६३१.८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित
इचलकरंजी : शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करणारी ६३१.८५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी थेट नळपाणी योजना जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहे. नजीकच्या दोन आठवड्यांत काळम्मावाडी योजनेला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे.साधारणत: ३० वर्षांपूर्वी पंचगंगा नदीचे पाणी दूषित होऊ लागले. परिणामी, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये शहरास पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना दूषित पाण्यामुळे किंवा नदीपात्रात पाणी नसल्याने बंद ठेवावी लागली. त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री प्रकाश आवाडे यांनी कृष्णा नदीतून पाणी आणणारी योजना आखली. ही योजना मार्गी लागली आणि आता गेली १४ वर्षे कृष्णा नदी व पंचगंगा नदी अशा दोन्हीही नद्यांचे पाणी शहरवासीयांना मिळते.शहराची वाढती लोकसंख्या पाहता या दोन्ही योजनांचे पाणी कमी पडू लागले. उन्हाळ्यात पंचगंगा नदीतील पाणी दूषित झाल्याने ही योजना बंद ठेवावी लागते. फक्तकृष्णा नळ योजनेतून पाणी उचलल्यामुळे शहरास दोन ते तीन दिवसांतून एक वेळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे प्रथम वारणा नदीतून पाणी आणण्याचा प्रस्ताव समोर आला; पण वारणा नदीतील पाणीसुद्धा भविष्यात दूषित होणार, म्हणून कोल्हापूर शहराप्रमाणे इचलकरंजी शहरासाठी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणण्याची योजना सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून मंजूर करण्यात आली.
सध्या काळम्मावाडी योजना ६३१.८५ कोटी रुपये खर्चाची असून, ती जीवन प्राधिकरणकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित आहे. याबाबत सध्याचे आमदार सुरेश हाळवणकर हे जातीने पाठपुरावा करत असून, त्यांच्या म्हणण्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या शंभर टक्के अनुदानावर विशेष बाब म्हणून ही योजना कार्यान्वित करावयाची आहे. ज्याचा बोजा इचलकरंजीतील नागरिकांवर पडणार नाही. जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मंजुरीनंतर राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी करीत आहेत. (प्रतिनिधी)