तांत्रिक बिघाड अन् हेलिकॉप्टरचे लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:02+5:302021-02-24T04:26:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : पुण्याहून गारगोटी येथे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. अचानक हेलकावे खाणाऱ्या या हेलिकॉप्टरला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : पुण्याहून गारगोटी येथे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. अचानक हेलकावे खाणाऱ्या या हेलिकॉप्टरला प्रसंगावधान राखून कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालयाच्या मैदानावर उतरण्याचा निर्णय पायलट वेणू माधव यांनी घेतला, पण अचानक उतरणाऱ्या हेलिकॉप्टरमुळे मैदानावर धुराचे लोळ निर्माण झाले आणि मुलांनी भीतीने वर्गाकडे धूम ठोकली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुण्याहून खासगी वाहतुकीसाठी गारगोटीकडे येरोट्रान्स या कंपनीचे हेलिकॉप्टर निघाले होते. यात पायलट वेणू माधव व एक को-पायलट होता. अचानक हेलिकॉप्टरला वातावरण व दिशा यांची माहिती देणारे सेंन्सर निकामी झाले. यामुळे पायलटला माहिती मिळत नसल्याने हेलिकॉप्टर आकाशात भरकटले. यामुळे सावधगिरी बाळगत खाडे महाविद्यालयाच्या मोठ्या मैदानात खाली घेऊन उतरण्याचा निर्णय झाला. परिसरात खाडे महाविद्यालयाच्या मैदानावर हेलिकॉप्टर कोसळल्याची अफवा पसरली आणि परिसरातील ग्रामस्थ, पालक यांनी खाडे महाविद्यालयाकडे धाव घेतली.
वातावरण शांत झाल्यानंतर हा अपघात नाही हे समजल्याने विद्यार्थी, पालक व लोकांनी नि:श्वास सोडला. शिक्षक व उपस्थितांनी हेलिकॉप्टरच्या पायलटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पायलट वेणू माधव यांनी कोणालाही माहिती देण्यास नकार दिला. हेलिकॉप्टरच्या समोर असणारे कॉम्फॅक्टर उघडून चाचपणी केली असता यात सेन्सरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. यानंतर करवीर पोलिसांना यांची माहिती दिल्याने संरक्षण देण्यात आले.
फोटो काढण्यासाठी झुंबड
हेलिकॉप्टर पहायला मिळणार यासाठी परिसरातील लोकांची झुंबड झाली. मुलांच्या बरोबर अनेकजण सेल्फी काढण्याचा आनंद घेताना दिसत होते.
(फोटो)
कोपार्डे (ता. करवीर) येथे महाविद्यालयाच्या प्रांगणात तांत्रिक बिघाड झाल्याने उतरण्यात आलेले हेलिकॉप्टर.