कोल्हापुरात शेंडा पार्कच्या २० एकर जागेत टेक्निकल पार्क, शाश्वत विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांच्यावतीने घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:59 PM2024-06-26T12:59:44+5:302024-06-26T13:00:36+5:30

विकासात काेल्हापूरला अग्रक्रमावर नेणार

Technical Park in 20 acres of Shenda Park in Kolhapur, announced by the Chief Minister at the Sustainable Development Council | कोल्हापुरात शेंडा पार्कच्या २० एकर जागेत टेक्निकल पार्क, शाश्वत विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांच्यावतीने घोषणा 

कोल्हापुरात शेंडा पार्कच्या २० एकर जागेत टेक्निकल पार्क, शाश्वत विकास परिषदेत मुख्यमंत्र्यांच्यावतीने घोषणा 

कोल्हापूर : जिल्ह्यातील तरुणाईला रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेंडा पार्कमधील ३२ एकरपैकी २० एकर जागेत टेक्निकल पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगळवारी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दरडोई उत्पन्न अडीच लाखाहून सहा लाखांपर्यंत नेत जिल्हा देशात अग्रक्रमांकावर नेण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू, असे आवाहन केले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेमार्फत हॉटेल सयाजी येथे आयोजित शाश्वत विकास परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी मित्र संस्थेचे सीईओ प्रवीणसिंह परदेशी, जॉइंट सीईओ सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जागतिक बँकेचे अधिकारी विजय के., आयुक्त वस्त्रोद्योग अवश्यंत पांडा, सहसचिव प्रमोद शिंदे, जॉइंट सीईओ अमन मित्तल उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या विभागांसमवेत उद्योजकांनी सामंजस्य करार केले. कोल्हापूरला शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी घोषणापत्राची निर्मिती करण्यात आली.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी शाहू मिल, उद्यमनगरी, कृषी, क्रीडा अशा अनेक मार्गातून जिल्ह्याला शाश्वत विकासाची सुरुवात करून दिली. त्यामुळेच आजही प्रत्येक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी कोल्हापूर सर्वोत्तम जिल्हा आहे. कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगलीत येणाऱ्या पूर निवारणासाठी ३२०० कोटी रुपये जागतिक बँकेकडून मिळणार असल्याने भविष्यात येथे पूर येणारच नाही, असे नियोजन केले जाईल.

मित्राचे सीईओ प्रवीणसिंह परदेशी यांनी जिल्हा केंद्रबिंदू मानून विकास करणे शक्य आहे. त्यासाठी युवकांमधील कौशल्य वाढ शैक्षणिक काळातच होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी येडगे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया या विषयांवर चर्चासत्र झाले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, समन्वयक डॉ. अरुण धोंगडे यांनी संयोजन केले. समीर देशपांडे, चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रमुख घोषणा

  • कन्व्हेन्शन सेंटरसाठी ४५० कोटी मंजूर.
  • आयटी विकासासाठी शेंडा पार्क येथील ३५.७१ हेक्टर व टेंबलाईवाडी येथील १.२९ हेक्टर जमीन एमआयडीसी किंवा आयटी संघटनेला प्लग ॲण्ड प्ले मॉडेलसाठी स्थलांतरित करणे.
  • एमआयडीसीद्वारे संपादित होणाऱ्या ५०० हेक्टर जमिनीपैकी ५० टक्के जमीन फौंड्री आणि अभियांत्रिकी कंपन्यांना देणे.
  • साहसी पर्यटनस्थळ विकासासाठी पर्यटन संचालनालयाच्या साहसी पर्यटन ऑपरेटर सोबत सामंजस्य करार. ग्रामीण पर्यटनाला चालना.


अधिकाऱ्यांचीच परिषद..

या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील, अशी मागील आठवड्याभरात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र स्थानिक नेते, प्रशासनातील अधिकारी आणि मोजके उद्योजक यांच्यापुरतीच ही परिषद मर्यादित राहिली. तीन पानांचे घोषणापत्र तयार झाले. आता त्या घोषणांचे पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Technical Park in 20 acres of Shenda Park in Kolhapur, announced by the Chief Minister at the Sustainable Development Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.