सीपीआर, आयजीएममधील ऑक्सिजन टाक्यांच्या देखभालीसाठी तंत्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:26 AM2021-04-23T04:26:27+5:302021-04-23T04:26:27+5:30
कोल्हापूर : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्यांच्या देखभालीबाबत ...
कोल्हापूर : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्यांच्या देखभालीबाबत दक्ष राहण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही याबाबत स्वतंत्र पत्रे काढली आहेत.
येथील सीपीआरमध्ये २० हजार लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली आहे. ३० फूट उंच आणि दोन मीटर व्यासाची ही टाकी गतवर्षी कोरोनाच्या उद्रेकानंतर ऑगस्टमध्ये बसविण्यात आली. यासोबतच ४०० क्यूबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. या टाकीमधून सीपीआरमधील १७ ठिकाणच्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन पुरविण्यात येतो. गेल्या वर्षभरापासून कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही. अगदीच येथील ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये अडचण निर्माण झाली, तर पर्यायी जम्बो सिलिंडर्सचीही सोय करण्यात आली आहे.
या टाक्यांच्या देखभालीसाठीही तंत्रज्ञांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञ रोज या ठिकाणी पाहणी करतात. जेव्हा टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर येतो, तेव्हासुद्धा नीट काळजी घेतली जाते. यावेळी कुठे गळती होते का याची पाहणी केली जाते.
चौकट -
इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयातसुद्धा सहा हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली असून, याचा २०० हून अधिक रुग्णांना फायदा होतो. १७ फूट उंचीची आणि दोन मीटर व्यासाची ही टाकी असून, या ठिकाणीही तंत्रज्ञ नेमण्यात आला आहे.
चौकट -
अधिष्ठातांकडून पाहणी
राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी गुरुवारी दुपारी ऑक्सिजन टाकीची पाहणी करून संबंधितांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. याचवेळी ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर आल्यामुळे या प्रक्रियेचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी डाॅ. उल्हास मिसाळ उपस्थित होते.
२२०१२०२१ कोल सीपीआर ०१
कोल्हापुरातील सीपीआरमधील ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरमधील द्रव ऑक्सिजन भरला जात असताना संबंधितांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
छाया.. समीर देशपांडे