बंदिजनांच्या पुनर्वसनाचे ‘तांत्रिकी’ पाऊल

By admin | Published: November 6, 2016 01:37 AM2016-11-06T01:37:12+5:302016-11-06T01:38:04+5:30

कास्टिंगचे झिरो रिजेक्शन काम : कळंबा मध्यवर्ती कारागृह, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज व शासकीय तंत्रनिकेतनचा उपक्रम

The 'technological' step for the rehabilitation of the people | बंदिजनांच्या पुनर्वसनाचे ‘तांत्रिकी’ पाऊल

बंदिजनांच्या पुनर्वसनाचे ‘तांत्रिकी’ पाऊल

Next

संतोष मिठारी -- कोल्हापूर- शिक्षा भोगल्यानंतर बंदिजनांना समाजात योग्य पद्धतीने उदरनिर्वाह करता यावा; त्यांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ‘तांत्रिकी’ पाऊल पडले आहे. या ठिकाणी घाटगे-पाटील इंडस्ट्रीज, शासकीय तंत्रनिकेतन आणि कारागृह प्रशासनातर्फे गेल्या सहा महिन्यांपासून ‘फौंड्री आॅन जॉब’ उपक्रम राबविला जात आहे. त्यातून बंदिजन दिवसाकाठी सुमारे ३५ टन कास्टिंग्जचे फिनिशिंग, फेटलिंगचे काम करीत आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमाची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत येथे पूर्णत: ‘झिरो रिजेक्शन’ उत्पादनाची निर्मिती झाली आहे. बंदिजनांमध्ये कौशल्य विकास साधण्याचा विचार करून कळंबा मध्यवर्ती कारागृह प्रशासन, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज आणि शासकीय तंत्रनिकेतन यांनी तीन वर्षांसाठी सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत बंदिजन, कैद्यांसाठी मे २०१६ मध्ये ‘फौंड्री आॅन जॉब’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये एकूण ६० कैद्यांच्या हातांना ट्रॅक्टर कास्टिंग्जच्या फिनिशिंगसह फेटलिंग (बर काढणे) करण्याचे काम मिळाले आहे. हे काम करून घेत त्यातूनच या कैद्यांना त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. काही दिवसांत या कैद्यांनी फेटलिंगच्या विविध स्वरूपांतील कामांत प्रावीण्य मिळविले आहे. सुरुवातीला दिवसाकाठी अवघ्या २६-२७ इतक्या होणाऱ्या सुट्या भागांचे काम आता ४५० पर्यंत पोहोचले आहे. रोज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत येथे ३५ टन कास्टिंग्जच्या फेटलिंगचे काम होते. जॉन डीअर, आयशर, एस्कॉर्ट, आदी ट्रॅक्टर उत्पादकांना लागणाऱ्या क्लच हाउसिंग, आर. ए. हाउसिंग, आयशर थ्री बोअर, फ्रंट केस, इटॉन केस, रिअर केस अशा विविध २३ सुट्या भागांच्या फिनिशिंगसह फेटलिंगचे काम अत्यंत अचूक स्वरूपात या कैद्यांकडून होते. त्यांना तांत्रिक स्वरूपातील मार्गदर्शनासाठी या ठिकाणी घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे एक पर्यवेक्षक आणि दोन जॉब इन्स्पेक्टर कार्यरत आहेत. औद्योगिक वसाहतींमधील कामगारांपेक्षा येथील उत्पादन, कामाची गुणवत्ता चांगली आहे. त्यांनी फेटलिंग केलेल्या एकाही सुट्या भागावर कंपनीला पुन्हा काम करावे लागलेले नाही. कामाची गुणवत्ता लक्षात घेऊन येथे कार्यरत कैद्यांची संख्या शंभर करून दोन शिफ्ट सुरू करण्याचा विचार कारागृह प्रशासनाचा सुरू आहे. तांत्रिक कौशल्यासह केलेल्या कामाचा चांगला मोबदला या कैद्यांना मिळत आहे. त्यातून कुटुंबीयांसाठीही त्यांना काही पैसे पाठविता येत आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके, वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. दिवसाकाठी प्रतिकैद्यामागे कंपनी दोनशे रुपये देते. यातील ५५ रुपये कैद्याला, ५० रुपये तंत्रनिकेतनला आणि ९५ रुपये शासनाला दिले जातात. तांत्रिक कौशल्य देऊन कैद्यांचे पुनर्वसन करण्याबाबतचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. औद्योगिक वसाहतीत पाठविणार : साठे बंदिजनांना नावीन्यपूर्ण उद्योगांतील कौशल्य मिळविता यावे, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना समाजात आत्मनिर्भरतेने काम करता यावे, याबाबतचे एक पाऊल म्हणून कळंबा कारागृहात ‘फौंड्री आॅन जॉब’ उपक्रम राबविला असल्याचे राज्य कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, पब्लिक-प्रायव्हेट पाटर्नरशिपअंतर्गत असणारा राज्यातील कारागृहांमधील हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमातील कार्यरत कैद्यांना खुल्या कारागृहांंतर्गत औद्योगिक वसाहतींमध्ये कामासाठी पाठविण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला आहे. कैद्यांना उद्योग-व्यवसायांतील कौशल्याचे धडे दिल्यास शिक्षेच्या पूर्णत्वानंतर त्यांचे समाजात चांगल्या पद्धतीने पुनर्वसन होण्यास मदत होईल. बंदिजनांचा कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबविण्याचे ठरविले.या उपक्रमातून आमच्या कंपनीला शंभर टक्के पक्के काम मिळत असल्याचे घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमासाठी यंत्रसामग्री आणि काम करणाऱ्यांच्या सुरक्षिततेची साधने कंपनीने पुरविली आहेत. औद्योगिक वसाहतीमधील सामान्य कामगारांपेक्षा कारागृहातील बंदिजनांकडून होणारे काम उत्कृष्ट होते. त्यांच्या कामाचा वेगही अधिक आहे. शिवाय त्यांनी केलेल्या जॉबवर पुन्हा काम करावे लागत नाही. विशेष म्हणजे उपक्रम सुरू झाल्यासपासून येथील कामांत ‘झिरो रिजेक्शन’ आहे. -संडे स्पेशल

Web Title: The 'technological' step for the rehabilitation of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.