गतिमान कामासाठी ‘तंत्रज्ञान कक्ष’
By admin | Published: December 25, 2014 11:30 PM2014-12-25T23:30:57+5:302014-12-26T00:04:59+5:30
जिल्हा परिषदेचा उपक्रम : माहिती अद्ययावत राहण्यासाठी उपयोगी; आवश्यक मनुष्यबळ नेमणार
भीमगोडा देसाई - कोल्हापूर -पंचायत राज संस्थांचे कामकाज गतिमान, लोकाभिमुख, पारदर्शक करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ‘मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेने तंत्रज्ञान कक्षासाठी चौथ्या मजल्यावर जागा निश्चित करून आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्रीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हा कक्ष सुरु होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना खेडोपाडी पोहोचविल्या जातात. योजनांसाठी प्राप्त निधी, भौतिक, आर्थिक प्रगती अहवाल सध्या त्वरित उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. यामुळे शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांमध्ये तंत्रज्ञान कक्ष सुरू करण्याचा आदेश दिला आहे. यानुसार जिल्हा परिषद स्तरावर कार्यवाही सुरू झाली आहे.
माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन राबविणे, गतीने माहिती उपलब्ध करून देणे, विविध प्रशासकीय विभागांतील माहितीचे अदानप्रदान करणे, जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील माहितीचे वेळच्या वेळी संकलन करणे, ई-गव्हर्नन्स सेवा देणे, केंद्र व राज्य शासनाकडील योजना, स्वउत्पन्नातून राबविण्यात येणाऱ्या योजना, ई-टेंडरिंग, सेवार्थ, शालार्थ, ई- पंचायत, आदींची माहिती अद्ययावत ठेवणे, ग्रामपंचायत पातळीवरील माहिती संकलन करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे, व्हिडिओ कॉन्फरन्स व बायोमेट्रिक सुविधा, लॅन जोडणी, सीसीटीव्ही, संगणक, प्रिंटर, यूपीएस, वेब कॅमेरा कार्यरत करणे अशी महत्त्वाची कामे कक्षातून चालणार आहेत.
जिल्हा परिषद हायटेक होण्यासाठी कक्षाचा हातभार लागणार आहे. कक्षातील कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. निमंत्रित सदस्य म्हणून आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांना घ्यावे, असे सूचित केले आहे. कक्ष सुरू करण्यासाठी आवश्यक खर्च जिल्हा परिषदेतर्फे विविध विभागांच्या योजना राबविण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या प्रशासकीय खर्चातून किंवा स्वनिधीतून करण्यात येणार आहे.
हा पूर्ण क्षमतेने चालावा, त्याचा संपूर्ण जिल्ह्याला उपयोग होऊन पंचायत राज संस्थांचे कामकाज गतिमान होण्याच्या दृष्टीने कक्षात आवश्यकतेनुसार तांत्रिक ज्ञान असलेल्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. लवकरात लवकर कक्ष सुरू करण्याच्या दृष्टीने येथील जिल्हा परिषद गतीने प्रक्रिया राबवीत आहे.
ग्रामपंचायती ‘कनेक्ट’
ग्रामपंचायती कक्षाशी आॅनलाईन कनेक्ट राहणार आहेत. परिणामी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर ‘नजर’ राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्तरांवरील अद्ययावत माहिती एका ‘क्लिक’वर उपलब्ध होणार आहे. माहिती अधिकारासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे.
तंत्रज्ञान कक्षासाठी कृषी विभागाशेजारी जागा निश्चित केली आहे. जागा ताब्यात मिळाल्यानंतर संगणक व अन्य सामग्री ठेवणार आहे. पाठपुरावा करून लवकर कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)