उदगाव ग्रामपंचायतमध्ये तहसीलदारांची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:48+5:302021-04-25T04:24:48+5:30
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे कोरोनाचे ४० रुग्ण आहेत. तरी देखील ग्रामपंचायत प्रशासन व ग्राम समिती कोणतीही उपाययोजना ...
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे कोरोनाचे ४० रुग्ण आहेत. तरी देखील ग्रामपंचायत प्रशासन व ग्राम समिती कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही अशी माहिती मिळताच शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी उदगाव ग्रामपंचायतमध्ये अचानक भेट दिली. आपत्ती व्यवस्थापन मधील अधिकारी जर हयगय करत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही असेही तहसीलदार यांनी सुनावले
उदगाव (ता. शिरोळ) येथे दुपारी दीडच्या सुमारास तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी अचानक भेट देऊन ग्रामपंचायत प्रशासनाला कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात जाब विचारला.
यावेळी सरपंच कलिमून नदाफ यांनी गावातील कोरोना रुग्णांची माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण कोळी व सलिम पेंढारी यांनी तलाठी चांदणे यांच्याविषयी तक्रार केली. तलाठी गावात उपस्थित नसतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावर तहसीलदार यांनी तलाठी चांदणे यांना इथून पुढे असे चालणार नसल्याचे सांगत त्याना नोटीस देणार असल्याचे सांगितले. या यावेळी राजेंद्र मगदूम, सलिम नदाफ, आरोग्य सेविका कांचन चौगुले, अश्विनी वास्के यांच्यासह ग्रा.पं. पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट- ग्रामविकास अधिकारी करतात नियमांची सरबत्ती
उदगाव येथील ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांना ग्रामस्थ गावातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यावर ते नियमाशिवाय दुसरे काही करत नाहीत. या पूर्वीचे ग्रामविकास अधिकारी कोरोना काळात निदान रस्त्यावर उतरुन काम करीत होते. परंतु वळवी नियम सांगत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली.
फोटो--उदगाव - येथे ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला जाब विचारताना तहसीलदार अपर्णा मोरे, शंकर कवितके, पांडुरंग खटावकर यांच्यासह पदाधिकारी.
छाया- अजित चौगुले, उदगाव