तेजस्विनी, राही, अंजली यांना राज्य शासनाचे बळ
By admin | Published: May 19, 2015 10:32 PM2015-05-19T22:32:10+5:302015-05-20T00:15:57+5:30
आॅलिम्पिक तयारी : प्रत्येकी पाच लाखांची मदत
कोल्हापूर : पुढील वर्षी होणाऱ्या ब्राझील आॅलिम्पिकच्या तयारीसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि अंजली भागवत यांना राज्य शासनाने क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून पाच लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांना देण्यात आला आहे.तेजस्विनी, राही आणि अंजली या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकिक केला आहे. त्याची नेमबाजीतील कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. आॅलिम्पिकमध्ये निवड होण्यासाठी चांगले गुणांकन आणि तयारी आवश्यक असते. त्यासाठी या नेमबाजपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागते. मात्र, या स्पर्धेसाठी होणारा खर्च स्वत: करणे परवडणारे नसते. त्यामुळे तेजस्विनी, राही व अंजली यांनी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेत आणि या सुवर्णकन्यांच्या कामगिरीचा आलेख वाढत राहावा तसेच ब्राझील येथील रिओ दि जेनेरिओ याठिकाणी २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारीसाठी त्यांना आर्थिक पाठबळ कमी पडू नये. यासाठी शासनाने त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत केली आहे. त्यातील तेजस्विनीला गेल्या तीन दिवसांपूर्वी शासनाने मदतीचा धनादेश दिला आहे. स्पर्धेनिमित्त सध्या राही व अंजली देशाबाहेर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडे मदतीचा धनादेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
परफॉर्मन्स सुधारण्यासह गुणांकन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते. मी, अंजली आणि राहीने वैयक्तिकपणे खर्च करून काही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पण, वारंवार असा खर्च करणे आम्हाला जिकिरीचे ठरत होते. त्यामुळे आम्ही आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाला विनंती केली. शासनाने त्याची तातडीने दखल घेत आम्हाला मदत केल्याचा आनंद आहे. शासनाने दिलेले पाठबळ आॅलिम्पिकसाठीच्या परफॉर्मन्स वाढीसाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल.
- तेजस्विनी सावंत, नेमबाजपटू