नृत्याविष्काराचा ‘तेजोमय तेजोनिधी’
By admin | Published: January 29, 2017 12:31 AM2017-01-29T00:31:40+5:302017-01-29T00:31:40+5:30
कार्याविषयी उलट-सुलट प्रश्न यांची उत्तरे देणारे संवादात्मक निवेदन प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर करणारे ठरले.
कोल्हापूर : ‘जगन्नाथाचा रथ..’, ‘ शतजन्म शोधिताना..’, ‘ हे हिंदू नृसिंहा प्रभो...’, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक काव्यप्रतिभेचे दर्शन घडविणाऱ्या रचनांचे भरतनाट्यम् नृत्याविष्कार सादरीकरणाने शनिवारी ‘तेजोमय तेजोनिधी’ कार्यक्रम रंगला. परावलंबी जीवन जगणाऱ्या व्यक्तींची सेवा वाहणाऱ्या सावली केअर सेंटरच्या इमारत निधीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (मुंबई), कलांगण (मुंबई) व नृत्यश्री (मिरज) या संस्थांतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गीतांवर आधारित नृत्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना फिअरलेस फ्लायर्स फौंडेशनची होती. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भाव सरगम’ या कार्यक्रमाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांनी नेहमीच गायक, संगीतकारांना भुरळ घातली आहे; पण याच कलाकृती जेव्हा भरतनाट्यम् नृत्यप्रकारातून सादर केल्या जातात तेव्हा एक देखणा कार्यक्रम उभा राहतो आणि सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची नव्याने ओळख होते, याचा प्रत्यय रसिकांना आला. सावरकरांच्या प्रचलित आणि अप्रचलित गीतांना वर्षा यांनी स्वरसाज चढविला होता. त्यावर नृत्यांगना धनश्री आपटे आणि त्यांच्या शिष्यांनी अभिनव पद्धतीने नृत्याविष्कार सादर केले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सावरकरांविषयी जनमानसांत असलेले अज्ञान, त्यांच्या कार्याविषयी उलट-सुलट प्रश्न यांची उत्तरे देणारे संवादात्मक निवेदन प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर करणारे ठरले.
दरम्यान, कार्यक्रमातून मिळालेल्या पाच लाखांचा धनादेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘सावली’चे डॉ. किशोर व गौरी देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. डॉ. देशपांडे यांनी ‘सावली’च्या नव्या इमारतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, फिजिओथेरपी जीम, देशातील पहिला वॉटर थेरपी पूल, शवागार, मल्टिपर्पज हॉल अशी इमारत असणार आहे.
मदत : दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानकडूनही
समाजासाठी झटणाऱ्या अनेक संस्थांना दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे एक लाखांची मदत देण्यात येते.
यंदा ही मदत सावली केअर सेंटरला देण्याची घोषणा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केली.
ही मदत दि २४ एप्रिलला
सावली संस्थेकडे देण्यात येणार आहे.