महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 11:59 AM2023-08-11T11:59:27+5:302023-08-11T11:59:58+5:30

या प्रकल्पांना मिळणार सवलती

Telangana government's shoes for entrepreneurs in Maharashtra, shower of incentives for setting up textile industry | महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव

महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी तेलंगणा सरकारच्या पायघड्या, वस्त्रोद्योग उभारल्यास सवलतींचा वर्षाव

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांसाठी तेलगंणाने पायघड्या अंथरल्या आहेत. नवीन प्रकल्प सुरू करणाऱ्यांवर भांडवली अनुदान, व्याज अनुदान, कर परतावा, यासह विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या धरसोडीच्या आणि उदासीनतेच्या धोरणाला वैतागलेले अनेक उद्योजक तेलंगणात आपल्या उद्योगाचे स्थलांतर करण्याच्या किंवा तेथे नवा प्रकल्प सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनीही तेलंगणात आपला उद्योग सुरू करावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तेलंगणात केंद्र सरकारचा एक आणि राज्य सरकारचे नऊ, असे दहा टेक्स्टाइल पार्क उभारण्यात येत आहेत. 

महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांची गेल्याच आठवड्यात हैदराबाद येथे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत राव यांनी राज्य सरकारने देऊ केलेल्या सवलतींची माहिती दिली, तसेच वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी राज्य सरकार उद्योजकांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक उद्योजकांनी तेलंगणात उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...या आहेत सवलती

  • कापड तयार करणाऱ्या पारंपरिक प्रकल्पाला एक कोटी रुपयांपर्यंत २५ टक्के भांडवली अनुदान. हीच मर्यादा तांत्रिक प्रकल्पासाठी (टेक्निकल टेक्स्टाइल) दोन कोटी रुपयांपर्यंत किंवा ३५ टक्के भांडवली अनुदान
  • प्रकल्पासाठीच्या कर्जावर २५ टक्के व्याज अनुदान.
  • व्हॅट, सीएसटी, एसजीएसटीचा परतावा सात वर्षांपर्यंत किंवा स्थिर भांडवली गुंतवणुकीएवढे उत्पन्न परत मिळेपर्यंत दिला जाणार.
  • प्रतियुनिट एक रुपया वीजदर सवलत.
  • स्टॅम्प ड्यूटी, ट्रान्स्फर ड्युटीही परत मिळणार.
  • कार्यालय किंवा प्रकल्पासठी भूखंड खरेदीत प्रतिएकर २० लाख रुपयांपर्यंत सवलत.
  • पर्यावरण रक्षण, ऊर्जा आणी पाणी या सुविधांसाठी ५० लाख रुपयांपर्यंत किंवा त्या उभारण्याकरिता लागणाऱ्या खर्चाच्या ४० टक्के मदत.


या प्रकल्पांना मिळणार सवलती

आधुनिक स्पिनिंग विव्हिंग मिल्स, डाॅइंग अँड प्रोसेसिंग, निटिंग, गारमेंट, कारपेटिंग, मशीन एम्ब्राॅयडरी, टेक्निकल टेक्स्टाइल्ससह वस्त्रोद्योगाच्या मूल्यवर्धित साखळीत समावेश असलेले कारखाने.
                      

तेलंगणा सरकारने वस्त्रोद्योग उभारणीसाठी मोठ्या सवलती दिल्यामुळे उद्योजक तिकडे जाणार असतील तर ते गंभीर आहे. महाराष्ट्र सरकारने या उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यासाठी तातडीने सोडविल्या पाहिजेत. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ

Web Title: Telangana government's shoes for entrepreneurs in Maharashtra, shower of incentives for setting up textile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.