सांगा कसे रोखायचे कोरोनाला... ग्राम समित्या कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:26+5:302021-05-01T04:21:26+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावा-गावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच, तर सचिव म्हणून ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावा-गावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच, तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. सुरुवातीला जिल्हाबंदी असताना परगावहून गावात येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण करण्यापासून ते कोरोनाबाधित रुग्णांचा कुणाकुणाशी संपर्क आला आहे याचा शोध घेण्यापर्यंत प्रशासनाकडून ग्रामसमित्यांची मदत घेतली जाते. गावात नव्याने येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ग्रामसमित्यांकडून घेतली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामसमित्यांनी अत्यंत कडक नियमावली लावून त्याची अंमलबजावणी केल्याने कित्येक गावे कोरोनापासून चारहात दूर होती. त्या गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या ग्रामसमित्या गायब झाल्याने नियमांची धास्तीच राहिली नाही. परिणामी, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी या ग्रामसमित्या पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट :
ज्या गावांमध्ये ग्राम आपत्ती समिती कागदावरच राहिली, अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कारण बाहेरून येणारे नागरिक, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था यांच्यावरती कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला होता. या ग्राम आपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते, तर कृषी सहायक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ग्राम आपत्ती समितीमध्ये आहे. सध्या कोरोना ग्राम आपत्ती समिती व्यवस्थापन समित्या कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात समितीचे कामकाज शून्य आहे.