सात हजार कोटींमध्ये किती आरोग्य सुविधा दिल्या ते सांगा; समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर टीकेचा भडिमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:31 PM2024-11-06T13:31:29+5:302024-11-06T13:32:51+5:30

साके : पालकमंत्री सात हजार कोटींचा निधी आणला म्हणतात, मग या निधीतून त्यांनी तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी किती आरोग्य केंद्रे, ...

Tell me how many health facilities were provided in seven thousand crores; Samarjit Ghatge's criticism of Hasan Mushrif | सात हजार कोटींमध्ये किती आरोग्य सुविधा दिल्या ते सांगा; समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर टीकेचा भडिमार

सात हजार कोटींमध्ये किती आरोग्य सुविधा दिल्या ते सांगा; समरजित घाटगेंचा मुश्रीफांवर टीकेचा भडिमार

साके : पालकमंत्री सात हजार कोटींचा निधी आणला म्हणतात, मग या निधीतून त्यांनी तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी किती आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे मंजूर करून आणली, पीसी सेंटरमध्ये किती आधुनिक सुविधा दिल्या ते जाहीर करावे. ग्रामीण जनतेला किरकोळ उपचारांसाठीदेखील तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते हाच पालकमंत्र्यांचा विकास म्हणायचा का, असा सवाल समरजित घाटगे यांनी मंगळवारी उपस्थित केला.

सावर्डे खुर्द (ता. कागल) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांत पालकमंत्र्यांनी मतदारसंघात एकही नवीन उद्योग-व्यवसाय न आणल्याने बेरोजगारी वाढली आहे. भूमिपुत्रांना रोजीरोटीसाठी बाहेरगावी जावे लागते ही शाहूंच्या भूमीची शोकांतिका आहे. टिमकी वाजवत असलेल्या विकासकामांच्या पुस्तकातून मतदारसंघात वाढलेल्या बेकारीची आकडेवारी पालकमंत्र्यांनी जाहीर करावी. आपला लोकसेवक म्हणून काम करण्याची आम्हाला संधी द्या आपल्याला आरोग्याच्या मूलभूत सुख-सुविधा उपलब्ध करून देऊ.

तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले, शरद पवार यांनी पंचवीस वर्षे कागलच्या गैबी चौकात ज्यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेऊन आमदार, मंत्री केले त्यांचाच पालकमंत्र्यांनी विश्वासघात केला आहे. आनंदा डाफळे, आकाश पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाहू कारखान्याचे संचालक डी.एस. पाटील, प्रताप पाटील, दिगंबर आस्वले, एल.डी. पाटील, चंद्रकांत दंडवते, ज्योतीराम मालवेकर, बचाराम पसारे, यशवंत मालवेकर, शिवाजी विष्णू डाफळे, भिकाजी कदम, बाळासो लिंगडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी उपसरपंच हिंदुराव मालवेकर यांनी प्रास्ताविक केले. गणेश मालवेकर यांनी आभार मानले.

कंत्राटदारांचा विकास हाच अजेंडा

माजी उपसरपंच हिंदुराव मालवेकर म्हणाले, २५ वर्षे सत्तेत असलेल्या पालकमंत्र्यांनी परिसरात कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत. कंत्राटदारांचा विकास म्हणजे जनतेचा विकास हाच त्यांचा अजेंडा राहिला आहे. त्यामुळे जनता आता सावध झाली असून, त्यांना निवडून देण्याची चूक पुन्हा करणार नाही.

Web Title: Tell me how many health facilities were provided in seven thousand crores; Samarjit Ghatge's criticism of Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.