टेंबलाई देवीला यंदा गोड नैवेद्य

By Admin | Published: July 23, 2014 11:27 PM2014-07-23T23:27:44+5:302014-07-23T23:32:35+5:30

सुज्ञ नागरिकांतून समाधान : कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा स्तुत्य निर्णय

Temblai Devi, this year, Goda Naivedya | टेंबलाई देवीला यंदा गोड नैवेद्य

टेंबलाई देवीला यंदा गोड नैवेद्य

googlenewsNext

गणपती कोळी - कुरुंदवाड
येथील पोलीस ठाण्यातील टेंबलाई देवीवर येथील पोलीस निरीक्षकांचाच कोप झाला असून, या देवीला बोकडाच्या रक्ताऐवजी शुद्ध शाकाहारीचा नैवेद्य मिळणार आहे. त्यामुळे देवीच्या नावावर मटनावर ताव मारणाऱ्यांवर संक्रांत आली असून, या निर्णयामुळे अनेक मुक्या जिवांना जीवदान मिळाले आहे. या स्त्युत्य निर्णयाने सुज्ञ नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
बहुतेक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात एखाद्या देवाचे अथवा देवीचे छोटेसे मंदिर असते. पोलिसांचा आपल्या दंडावर विश्वास असला, तरी या देवीवरही मोठा विश्वास असतो. देवीचा कोप झाल्यास आपल्या वैयक्तिक सेवेत अथवा पोलीस ठाण्यावर आपत्ती कोसळते, असा दृढ अंध विश्वास पोलिसांचा आहे. त्यामुळे या देवीची पर्यायाने पोलीस ठाण्यात शांतता नांदावी, या उद्देशाने पोलीस ठाण्याच्यावतीने देवीचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव विशेषत: जुलैमध्ये या मंदिरासमोर बोकडांचा बळी देऊन साजरा केला जातो.
अवैध व्यावसायिकांकडून यासाठी मोठा निधी गोळा केला जातो. पोलिसांचा आशीर्वाद पाठीशी राहण्यासाठी अवैध व्यावसायिकही सढळ हाताने निधी देतात. या निधीतून १५ ते २० बोकडांचा बळी दिला जातो.
येथील पोलीस ठाण्यातील टेंबलाई देवीच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक वर्षी १२ ते १५ बोकडांचा बळी दिला जातो. शुक्रवारी (दि. २५) या देवीचा उत्सव साजरा होत आहे. त्यासाठी काही पोलीसही आपल्या कामात गुंतले आहेत. मात्र, एक महिन्यापूर्वी रुजू झालेले नूतन पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी अवैध व्यावसायिकांकडून निधी गोळा करून मुक्या जिवांचा बळी देऊन उत्सव साजरा करण्याची प्रथा बंद पाडण्याचा निर्णय घेतला आहे. या देवीला केवळ गोडे नैवेद्य दाखवून औपचारिक उत्सव साजरा करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे मुक्या जिवांना मुक्ती मिळाली आहे.
प्रथा बंद करणार
प्रथा बंद करणार
पोलीस ठाण्यामध्ये म्हाईच्या नावाखाली रक्ताचा बळी देणे चुकीचे आहे. अशाने देवी प्रसन्न होते ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच अवैध व्यवसायावर कारवाई करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र, अशा उत्सवाच्या माध्यमातून अवैध व्यावसायिकांकडून अवैधपणे निधी गोळा करणे म्हणजे त्यांना सलगी देण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे ही परंपरा, चुकीची प्रथा बंद पाडून देवीपुरता गोड नैवेद्य दाखवून म्हाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Temblai Devi, this year, Goda Naivedya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.