नावीन्यपूर्ण उपक्रमांचा टेंबलाईवाडी पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:58 AM2019-04-20T00:58:32+5:302019-04-20T00:58:37+5:30
प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कष्टकरी पालकांची मुले शिक्षणाचे धडे ‘सेमी-इंग्लिश’ माध्यमातून गिरवितात. मुलांना दर्जेदार शिक्षण, ...
प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कष्टकरी पालकांची मुले शिक्षणाचे धडे ‘सेमी-इंग्लिश’ माध्यमातून गिरवितात. मुलांना दर्जेदार शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मैदान, खासगी शाळांनाही लाजवेल असा परिसर व दर्जेदार शैक्षणिक वातावरण महापालिकेची टेंबलाईवाडी विद्यालय, शाळा क्रमांक ३३ मध्ये पाहावयास मिळते. या शाळेने सर्वांगीण विकास साधला आहे.
टेंबलाईवाडी येथील या शाळेची स्थापना १९५३ मध्ये झाली. टेंबलाई विद्यालयात बहुतांश विद्यार्थी सामान्य कुटुंबातील व ग्रामीण भागातील आहेत. पहिली ते सातवी इयत्ता असणाऱ्या या शाळेमध्ये सन २००८ मध्ये सेमी-इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आली. महापालिकेच्या शाळेमध्ये सुमार दर्जाचे शिक्षण मिळते, असा गैरसमज असल्याने या परिसरातील पालकांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी जास्त ओढा होता. महानगरपालिकेच्या या शाळेत मोफत शिक्षण असूनसुद्धा कष्टकरी वर्गातील पालकही आपल्या पाल्यांना खासगी शाळांतून शिक्षण देण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र येथे पाहण्यास मिळत होते.
महानगरपालिकेच्या शाळांविषयी जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर परिवर्तन महत्त्वाचे आहे, हा विचार येथील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जाणला आणि शाळेत भौतिक सोईसुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरणनिर्मितीही केली. शाळेला भव्य क्रीडांगण आहे; त्यामुळे क्रीडा स्पर्धांतूनही शाळा मागे नाही. या सर्व बाबींमुळे महानगरपालिकेच्या या शाळेकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला. काही पालकांनी इंग्रजी माध्यमातील आपल्या पाल्यांना खासगी शाळेतून काढून या शाळेत दाखल केले; त्यामुळे या शाळेची ६०० विद्यार्थ्यांची क्षमता असतानासुद्धा ७४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिलीमध्ये १५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यांच्या तीन तुकड्या झाल्या आहेत. शाळेतील शिक्षकांच्या अथक परिश्रमांसह अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिल्याने शिष्यवृत्ती परीक्षा, क्रीडा स्पर्धेमध्ये ही शाळा शहरात अव्वल ठरत आहे. उत्तम शिक्षण मिळत असल्याने परिसरातील पालकवर्गामध्येही समाधानाचे वातावरण असून, सामाजिक जाणीव जोपासणारी अशी शाळा अन्यत्र कुठेही नाही, अशी भावना पालकांमधून होत आहे. वंचित घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याच्या चळवळीमुळे अनेकांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडून त्यांचे जीवन नव्याने उजळले आहे.
शाळेतील वर्धन माळी याने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत २०१६-१७ साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावून महानगरपालिकेतील शैक्षणिक गुणवत्तेची मोहोर राज्यात उमटविली.
यावर्षी शाळेतील शिक्षिका पुष्पा गायकवाड यांनी वर्षभर एकही सुटी न घेता मुलांना मार्गदर्शन केले होते; त्यामुळे हा प्रयोग ‘टेंबलाईवाडी पॅटर्न’ म्हणून राज्यात प्रसिद्ध झाला.
तसेच अनेक मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य व जिल्हास्तरावर विशेष चमकदार कामगिरी केली आहे.
अद्ययावत प्रयोगशाळा व क्रीडांगण
केंद्र सरकारच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत सात लाखांची अद्ययावत प्रयोगशाळा येथे आहे. यामध्ये ५२० उपकरणे आहेत. तसेच महाराष्ट्र क्रीडांगण विकास अनुदानाअंतर्गत तीन लाख रुपये शाळेसाठी मिळाले आहेत. त्याद्वारे कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलचे मैदान तयार केले आहे.
वाढीव वर्गांची गरज
शाळेची क्षमता ६०० असताना शाळेत या वर्षअखेर ७४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तो वाढणार असल्याने येथील वर्गखोल्या व अन्य सुविधा अपुºया पडणार आहेत. या सुविधा शाळेस मिळाल्यास त्या अन्य विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी सोईस्कर होणार आहे.